

पुणे: गेल्या अकरा महिन्यांत पुणे आरटीओकडून 1 हजार 464 शालेय वाहनांची तपसणी करण्यात आली. त्यात 249 वाहने दोषी आढळली. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, 22 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच, यापुढेही ही कारवाई सुरू राहणार असून, शहरातील शाळा प्रशासनाने आणि स्कूल बस, स्कूल व्हॅन मालकांनी शालेय नियमावलीचे कठोर पालन करावे, अन्यथा नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे.
शहरासह राज्यभरात शालेय वाहनांचे वाढते अपघात लक्षात घेता, पुण्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आरटीओ कारवाईचा आढावा घेण्यात आला. या वेळी जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या अकरा महिन्यांत केलेल्या कारवाईची माहिती पुणे आरटीओ प्रशासनाने दिली. परिवहन विभाग आणि पोलिस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नियमित व संयुक्त तपासणी मोहीम लवकरच राबवली जाईल. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कडक दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
शैक्षणिक सहलींसाठी विशेष दक्षता...
शाळांनी आयोजित केलेल्या शैक्षणिक सहलींच्या वेळीही विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षितपणे व्हावी, याची विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सहलीच्या वाहनांची वैध कागदपत्रे सोबत असणे बंधनकारक आहे. शालेय सहलीला जाण्यापूर्वी आरटीओकडून परमिट घेणे बंधनकारक आहे. सार्वजनिक वाहतुकीसह सर्व प्रकारच्या खासगी बस, शालेय वाहने (सुटीच्या दिवशी) यांना बंधनकारक आहे, असेही आरटीओ प्रशासनाने सांगितले.
या नियमांचे पालन करा...
विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे शाळा व्यवस्थापन व वाहन मालकांना बंधनकारक आहे.
6 वर्षांखालील मुलांना ने-आण करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे बंधनकारक आहे.
मुली असणाऱ्या शाळांच्या वाहनांमध्येही महिला कर्मचारी बंधनकारक आहे.
वाहनचालक, कंडक्टर आणि मदतनीस (क्लिनर) यांची पोलिस विभागामार्फत चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक आहे.
सर्व शालेय परिवहन समिती/विद्यार्थी सुरक्षा समित्यांनी स्कूल बसचालकांची दरवर्षी नेत्र तपासणी झाली असल्याची खात्री करावी. तपासणी प्रमाणपत्र नसलेल्या चालकांना शालेय विद्यार्थी वाहतूक करण्यास मनाई असेल.
शालेय परिवहन समितीची स्थापना बंधनकारक
शिक्षण विभागाने शासन निर्णयानुसार (दि.16 एप्रिल 2025) सर्व शाळांमध्ये शालेय परिवहन समिती किंवा विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती तातडीने स्थापन करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. या समित्यांनी नियमांचे पालन होत आहे की नाही, याची नियमित तपासणी करायची आहे.
शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक हा अत्यंत संवेदनशील विषय असून, या दृष्टीने पुणे शहर पोलिस आयुक्त आणि जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीचे अध्यक्ष यांनी शाळा प्रशासन तसेच स्कूल बस, स्कूल व्हॅन चालक-मालक यांना विशेष दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्कूल बस नियमावलीचे काटेकोर पालन करणे, अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार आरटीओकडूनही सातत्याने शालेय वाहनांची वेळोवेळी तपासणी करून दोषी वाहनांवर कारवाई केली जात आहे. ही कारवाई आगामी काळात अधिक तीव केली जाणार आहे.
स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे