समीर भुजबळ
वाल्हे (पुणे) : शहरात पालखी महामार्गाचा रुंद-अरुंदचा खेळ सुरू होत असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी आणि अपघातांची मालिका सुरू आहे. लवथळेश्वर मंदिरासमोर अचानक पालखी मार्ग एकेरी होतो. या ठिकाणी पायी चालणार्यांची संख्या जास्त आहे. ते लोक डांबरी रस्त्यावरूनच चालतात, त्यामुळे वाहनांना रस्ता पुरत नाही. पुढे रस्ता कधी मोठा, तर कधी अरुंद होतो.
बसस्थानक ते डॉ. आंबेडकर चौकापर्यंतची (बारामती कॉर्नर) अतिक्रमणे काढली. मात्र, रस्ता रुंदीकरण न केल्याने अरुंद डांबरी रस्त्याने वाहनचालक वाहन चालवतात. पुढे कधी अचानक रुंद, तर अचानक अरुंद रस्ता व पोलिस स्टेशनच्या पुढे गेल्यावर तीव्र चढ आहे. या चढावर जेजुरी शहरात जाण्याचा रस्ता आहे. त्या ठिकाणी नेहमी अपघात होत असतात.
औद्योगिक वसाहतीआधी एक अतिशय अरुंद पूल आहे. या ठिकाणी निरेतील दोघा व्यावसायिकांचा मृत्यू झाला होत. पुढे औद्योगिक वसाहतीच्या मुख्य चौकात वारंवार अपघात होत आहेत. औद्योगिक वसाहतीच्या पुढे भोरवाडी फाटा ते निरा यादरम्यान अत्यंत अरुंद धोकादायक रस्ता आहे. वाल्हे नजीक कामठवाडी ते निरा यादरम्यानचा पालखी महामार्गावरील अत्यंत धोकादायक खडतर प्रवास आहे.
कामठवाडीच्या पुढे लोहमार्गावर विस्तारीकरणादरम्यान रेल्वे प्रशासनाकडून संरक्षक भिंत बांधण्यात आली असून, यादरम्यानचा पालखी महामार्ग रुंदीकरण करून पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, याकडे अद्याप कोणाचेच लक्ष नसल्याचे स्पष्ट होत आहे. या सर्व ठिकाणी पालखी सोहळ्यावेळी तकलादू सुरक्षिततेची साधाने लावली जातात. पण, नंतर बारा महिने ही अवस्था तशीच असते. ही धोकादायक ठिकाणे कमी करणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे काम आहे. मात्र, ती न करता प्रवाशांच्या जिवाशी खेळ खेळत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
हेही वाचा