बारामती पोलिसांकडून टँकर चोराला अटक | पुढारी

बारामती पोलिसांकडून टँकर चोराला अटक

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुका पोलिस ठाण्यात 12 लाख रुपयांचा टँकर चोरीला गेल्याच्या दाखल गुन्ह्याची पोलिसांकडून अवघ्या दोन दिवसांत उकल करण्यात आली. या प्रकरणी तालुका पोलिसांनी हनीफखान मुक्तारखान पठाण (वय 42, रा. चांदापुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला पेण (जि. रायगड) येथून ताब्यात घेत अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरीचा टँकर हस्तगत करण्यात आला. विशेष म्हणजे चोरट्याने या टँकरला असणारी जीपीएस सिस्टीम ताम्हिणी घाटात गेल्यानंतर बंद केली होती.

त्यामुळे टँकरचा तपास अधिक क्लिष्ट बनला होता. याच टँकरवर त्याने यापूर्वी चालक म्हणून काम केले होते. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आदित्य मनोजकुमार जगताप (रा. पणदरे, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली होती. शुक्रवारी (दि. 2) रात्री ही घटना घडली होती.
जगताप यांचा अमृतसागर एंटरप्रायजेस नावाने ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडील टँकर (एमएच 10 एडब्ल्यू 7474) वर रियाज शेख नावाचा चालक महिनाभरापासून काम करत होता.

टँकरची थोडी दुरुस्ती करायची असल्याने शुक्रवारी हा टँकर बारामती एमआयडीसीतील डायनामिक्स डेअरीजवळ लावण्यात आला होता. दुसर्‍या दिवशी शेख हा त्या ठिकाणी गेला असता टँकर मिळून आला नाही. त्यामुळे पोलिसांत फिर्याद देण्यात आली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी कंपनी व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एक व्यक्ती टँकर चोरून नेताना दिसून आली. बारकाईने पाहणी केली असता यापूर्वी टँकरवर चालक म्हणून काम करणार्‍या पठाण यानेच तो चोरल्याचे दिसून आले.

पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय लेंडवे, सहाय्यक फौजदार अनिल ओमासे, दत्ता मदने, संतोष मखरे यांच्या पथकाकडून या गुन्ह्याचा तपास केला जात होता. या टँकरला जीपीएस प्रणाली होती. परंतु पठाण याने ती बंद केली होती. परंतु ताम्हिणी घाटापर्यंतचे लोकेशन पोलिसांना मिळाले होते. त्याद्वारे पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. अखेर पेण (जि. रायगड) येथे पोहोचले. तेथून त्यांनी पठाण याला ताब्यात घेत टँकर हस्तगत केला.

Back to top button