280 कोटींच्या फसवणूकप्रकरणी सीबीआयकडून बिल्डरला अटक | पुढारी

280 कोटींच्या फसवणूकप्रकरणी सीबीआयकडून बिल्डरला अटक

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 280 कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबआय) दक्षिण मुंबईतील रेहान डेव्हलपर्सचा बांधकाम व्यावसायिक हरीश मेहता याला अटक केली आहे. सीबीआयने 20 मे रोजी ही कारवाई केली असून मेहता हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरुन सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) 2016 मध्ये याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सीबीआयने या प्रकरणाचा तपास करत 2018 मध्ये राजपूत रिटेल्स आणि त्याचे प्रवर्तक विजय गुप्ता आणि अजय गुप्ता, एसबीआयचे अधिकारी व्ही. एन. कदम आणि अन्य दोन जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. तर, सुमारे पाच वर्षांपूर्वी सीबीआयने रुबी मिल्सचे व्यवस्थापकीय संचालक भरत शहा यांनाही याप्रकरणात अटक केली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. सीबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू ठेवत हरीश मेहता आणि त्यांच्या कंपन्यांचा तपास केला.

बांधकाम व्यावसायिक हरीश मेहता याने भरत शहा, विजय गुप्ता आणि अजय गुप्ता यांच्या संगनमताने एसबीआयची 280 कोटी रुपयांची फसवणूक केली. या गुन्ह्यातून मेहता याला 50 कोटी रुपये मिळाले. रुबी मिल्सकडून कर्जाच्या रुपात ही रक्कम मिळाल्याचा आरोप आहे. या रकमेचा वापर वैयक्तिक कारणांसाठी केला आणि कर्जाच्या स्वरूपात त्यांच्या सहयोगी कंपनीत त्या रकमेची गुंतवणूक केली. दादरमधील रुबी इमारतीमधील जागा खरेदी करण्यासाठी रुबी मिल्सकडे पैसे वळवण्यापूर्वी बनावट कागदपत्रांच्या मदतीने गुप्तांनी बँकेकडून कर्ज घेतले होते.

शहा यांनी राजपूत रिटेल्सच्या गुप्ता आणि मेहता यांच्यासोबत इमारतीच्या चौदा, पंधरा आणि सोळाव्या मजल्याच्या विक्रीसाठी करार केला.

Back to top button