State-cabinet-expansion : शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? | पुढारी

State-cabinet-expansion : शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार?

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : State-cabinet-expansion : वर्षभरापासून रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार शिवसेनेच्या वर्धापनदिनी किंवा त्याआधी म्हणजेच याच महिन्यात होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. यासोबतच शिंदे गट शिवसेनेचे दोन खासदार केंद्रात मंत्री होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रविवारी दिल्ली गाठली. तेथे दोन्ही नेत्यांनी रविवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. विधानसभा व लोकसभा निवडणुकांची तयारी आणि राज्य मंत्रिमंडळ विस्तार (State-cabinet-expansion) हे विषय या चर्चेत होते. स्वत: मुख्यमंत्री शिंदे यांनीही ट्विट करून सांगितले की, शहांसोबत कृषी, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर चर्चा झाली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच हा विस्तार करण्यात येईल.

अर्थात मुख्यमंत्री शिंदे यांनी नेहमीप्रमाणे विस्तार लवकरच होणार, असे सांगताना कोणताही ठोस मुहूर्त दिलेला नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकदा लवकरच विस्तार होणार असे सांगितले असल्याने याही मुहूर्ताबद्दलचे कुतूहल कायम आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचा वर्धापन दिन 19 जून रोजी आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शिवसेनेचा ताबा उद्धव ठाकरेंकडून शिंदे गटाकडे आल्यानंतर होत असलेला हा पहिलाच वर्धापन दिन दणक्यात साजरा करण्याचे नियोजन आहे. त्या जोडीला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा, असे खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांना वाटते. मात्र, अमित शहा यांनी तशी परवानगी दिली किंवा नाही हे गुलदस्त्यात आहे. पण हा विस्तार शिवसेनेच्या वर्धापनदिनी किंवा त्यापूर्वीही म्हणजेच पुढच्या आठवड्यात होऊ शकतो, अशी माहिती शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी दिली. या मुहूर्तानुसार मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास शिवसेना व भाजपमधील प्रत्येकी दहा आमदारांना संधी मिळेल. काही महिलांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

State-cabinet-expansion : शिवसेनेला केंद्रात दोन मंत्रिपदे

राज्याबरोबरच केंद्रीय मंत्रिमंडळातही खांदेपालट होण्याची शक्यता असून, या फेरबदलात शिंदे यांच्यासोबत असलेल्या खासदारांपैकी दोन नेत्यांना मंत्रिपदे मिळू शकतात. बुलढाण्याचे प्रतापराव जाधव आणि उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार व ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांची त्यात वर्णी लागण्याची शक्यता आहे. सध्या शिंदे यांच्यासोबत 13 खासदार आहेत. शिवसेना 2019 पूर्वी एनडीएमध्ये होती, तेव्हा त्यांच्याकडे एक कॅबिनेट मंत्रिपद होते. मात्र, सध्या शिवसेना हाच एनडीएमधील भाजपनंतरचा सर्वात मोठा मित्र पक्ष असल्याने महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन शिंदे गटाला दोन मंत्रिपदे केंद्रात मिळू शकतात.

State-cabinet-expansion : शिंदेेंच्या शिवसेनेला बंडाची भीती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होण्यास तब्बल 41 दिवस लागले. त्यानंतर गेले दहा महिने विस्ताराच्या केवळ चर्चा होत आल्या. यात भाजपची तशी अडचण नाही. पक्ष घेईल तो निर्णय भाजपचे आमदार व नेते मान्य करतील. मात्र, शिंदे गटातून प्रत्येक आमदार मंत्रिपदाचा दावेदार असल्याने मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीला तोंड फुटू शकते. ही भीती असल्याने विस्तार लांबलेला बरा, हीच भूमिका मुख्यमंत्री शिंदे घेत आले, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या चर्चेत असलेल्या मुहूर्तावर मंत्रिमंडळ विस्तार होईलच, याची खात्री कुणीही देण्यास तयार नाही.

हे ही वाचा :

राज्यातील शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत घसरण!

यंदा मान्सूनचे आगमन लांबले; उद्यापर्यंत केरळमध्ये पोहचण्याचा अंदाज

Back to top button