

जेजुरी: प्रेयसीसोबत लग्न केल्याच्या रागातून प्रियकराने प्रेयसीच्या पतीचा धारदार कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील या घटनेने खळबळ उडाली आहे. दीपक गोरख जगताप (रा. राजेवाडी, ता. पुरंदर) असे खून झालेल्या नवविवाहित तरुणाचे नाव आहे, तर त्याचा खून केल्यानंतर आरोपी सुशांत संदीप मापारी (रा. माळशिरस, ता. पुरंदर; मूळ रा. राहू, ता. दौंड) हा फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
राजेवाडी येथील दीपक जगतापचा वाघापूर (ता. पुरंदर) येथील पायल अमोल कांबळे हिच्याशी महिन्यापूर्वी प्रेमविवाह झाला होता. दीपक जगताप हा उरुळी कांचन येथे खासगी गॅरेजमध्ये नोकरी करीत होता. लग्नानंतर सहा दिवसांनी तो पत्नीसह उरुळी कांचन येथे नोकरीनिमित्त राहण्यास गेला होता. महिनाभर संसार सुरळीत चालू असताना पायलचा पहिला प्रियकर सुशांत मापारी हा फोन करून या नवदाम्पत्याला त्रास देत होता. ममी पायलशी लग्न करणार होतो. तुम्ही दोघांनी लग्न का केले?फ असे म्हणत तो दीपक आणि पायल यांना जिवे मारण्याच्या धमक्या देत होता. याबाबत दीपकने आपल्या कुटुंबीयांना माहिती दिली होती.
दरम्यान, शनिवारी (दि. 13) दीपक हा पत्नी पायलसह राजेवाडी येथे आला. पत्नीला घरी सोडून तो आरोपी सुशांत मापारीला भेटण्यास गेला होता. आरोपी सुशांत दीपकला सतत कॉल करून पायलचा मोबाईल माझ्याकडे आहे, तो घेऊन जा. तसेच लग्नाचा वाद मिटवून टाकू, असे सांगत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला भेटून येतो, असे पत्नीला सांगून दीपक माळशिरस येथे गेला होता. सुशांतने माळशिरस गावच्या हद्दीत रामकाठी शिवारात दीपकला बोलावून घेतले. त्या ठिकाणी त्याने दीपकच्या डोक्यात, मानेवर, पायावर धारदार कोयत्याने वार केले. त्यात दीपकचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी सुशांत कोयता जागेवरच टाकून पसार झाला आहे.
दुसरीकडे दीपक जगताप घरी आला नाही तसेच त्याचा मोबाईलही बंद येत होता. त्यामुळे नातेवाइकांनी दीपकचा शोध घेतला. त्या वेळी माळशिरस गावच्या रामकाठी शिवारात रक्तबंबाळ अवस्थेत दीपकचा मृतदेह आढळून आला. या ठिकाणी दीपक आणि आरोपी सुशांत या दोघांच्या दुचाकी आढळून आल्या. याप्रकरणी मृत दीपकचे मामा संतोष शेंडकर (रा. चांबळी, ता. पुरंदर) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत माहिती मिळताच बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिराजदार, सासवड उपविभागिय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौड यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश पाटील तपास करीत आहेत.