

बारामती: शहरातील जुना मोरगाव रस्ता परिसरातील वेताळबाबा मैदानात रविवारी (दि. १४) रात्री साडे अकराच्या सुमारास मित्रांकडून एका युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. अविनाश उर्फ माऊली धनंजय लोंढे (वय २०, रा. बारामती) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
या प्रकरणी शहर पोलिसांनी समीर इक्बाल शेख (वय २५, रा. देवळे इस्टेट. बारामती) व प्रथमेश राजेंद्र दळवी (वय २०, रा. जगतापमळा, बारामती) या दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे तिघे शहरातील जुना मोरगाव रस्त्यावरील लेंडीपट्टा येथील वेताळबाबा मैदानात दारु पित बसले होते. त्यावेळी त्यांच्यात शिविगाळ, बाचाबाची झाली. त्यातून वाद वाढला.
समीर व प्रथमेश या दोघांनी दगड घेत तो अविनाश याच्या डोक्यात घातला. तो मरेपर्यंत त्याला दगडाने ठेचून मारण्यात आले. त्यानंतर हे दोघे पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान शहरात या घटनेने खळबळ उडाली आहे.