

पुणे: शहराच्या दीर्घकालीन हितासाठी केंद्र आणि राज्य सरकारसह पुणे महापालिकेच्या वतीने आखलेल्या सुमारे 3 हजार 63 कोटी रुपयांच्या विकासकामांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (दि. 15) एकाच वेळी पायाभरणी होत आहे. यात प्रामुख्याने पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया, रस्ते विकास, आरोग्य, शालेय शिक्षण, सुशासन या विभागांचा समावेश आहे. यातील काही महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे शहराचा कायापालट होईल, असा विश्वास पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी व्यक्त केला.
सर्वांना 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत विविध उपनगरांत साठवण टाक्यांचे बांधकाम प्रगतिपथावर होते. यातील 17 टाक्यांचे लोकार्पण सोमवारी होणार आहे. याशिवाय कात्रज आणि पाषाण येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची नवी इमारत, नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाची लोहगाव येथील नवी इमारत, चांदणी चौक-बाणेर-खराडी येथील नवी अग्निशमन केंद्र, सिंहगड रस्त्यावरील आपत्ती व्यवस्थापनासाठीचे इंटिग््रेाटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि पुणे महानगरपालिकेचे विविध दवाखाने, आरोग्य केंद्रे, दिव्यांग उपचार केंद्र यांच्यासह महानगरपालिकेच्या काही सुशासनपर डिजिटल उपक्रमांचेही लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि निवडणूकप्रमुख गणेश बिडकर यांनी दिली.
शहराच्या पश्चिम भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत 2.0 योजनेअंतर्गत वडगाव बुद्रुक येथे 125 एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित होता. या प्रकल्पाचे भूमिपूजन आज होणार आहे. याच योजनेअंतर्गत शहरातील सहा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचा क्षमताविस्तार होणार असून, त्याचेही भूमिपूजन आज होणार आहे. याखेरीज समाविष्ट गावांसाठी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शेवाळेवाडी आणि केशवनगर विभागातील विविध कामे, समाविष्ट गावांसाठी मलनिःसारण वाहिन्यांची कामे आणि हडपसर येथील यांत्रिक हस्तांतरण केंद्राचे भूमिपूजन होईल.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सुरू असलेल्या बहुस्तरीय उड्डाणपुलाला सेनापती बापट रस्त्याकडून जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
विद्यापीठ चौकासह येरवडा येथील बिंदुमाधव ठाकरे चौकातही उड्डाणपूल व ग््रेाडसेपरेटर प्रस्तावित आहे. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित कार्यक्रमात आचार्य आनंदऋषीजी महाराज चौकातील ग््रेाडसेपरेटर, पुणे ग््राँड टूर 2026 या जागतिक सायकल स्पर्धेसाठीचे रस्ते, कमला नेहरू रुग्णालयाचे आधुनिकीकरण, पुणे महापालिकेचा ‘मॉडेल स्कूल’ उपक्रम (पहिला टप्पा), पुणे महानगरपालिकेच्या विविध इमारतींवरील सौर प्रकल्प, राजीव गांधी प्राणिसंग््राहालयातील नवे सर्पोद्यान व इतर उपक्रम आणि शहराच्या विविध भागांतील नवे रस्ते, पदपथ यांचे भूमिपूजन संपन्न होईल.