

जेजुरी: पुरंदर तालुक्यातील ग््राामीण भागासह पुणे- पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील जेजुरी व सासवडशेजारील गोटेमाळ येथील सीएनजी पंप गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने सीएनजी वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या दोन्ही पंपांवर अवलंबून असलेली वाहने सध्या सासवड शहरातील एकमेव सीएनजी पंपावर इंधन भरण्यास येत असल्याने तेथे दिवस-रात्र प्रचंड गर्दी होत आहे.
यातच सासवड येथील सीएनजी पंप अनेकदा ऑनलाइन नसल्याने पुरेशा प्रमाणात सीएनजी उपलब्ध होत नाही. परिणामी वाहनचालकांना तासन्तास रांगेत थांबावे लागत असून, अनेक वेळा इंधन न मिळाल्याने वाहनधारकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
जेजुरी हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून खंडोबाच्या दर्शनासाठी दररोज राज्याच्या विविध भागांतून भाविक येथे येतात. याशिवाय जेजुरी परिसरात औद्योगिक वसाहत असल्याने हजारो कामगार, उद्योजक व व्यावसायिकांची सातत्याने ये-जा सुरू असते. पुणे- पंढरपूर महामार्गावरही मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. अशा अत्यंत महत्त्वाच्या मार्गावरील दोन्ही सीएनजी पंप बंद असल्याने खासगी वाहने, टॅक्सी, रिक्षा तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने शासनाने सीएनजी वाहनांना प्रोत्साहन दिले असले, तरी त्यासाठी आवश्यक असलेल्या इंधन सुविधांची उपलब्धता पुरेशी नाही. पुरंदर तालुक्यातील उपलब्ध दोन्ही सीएनजी पंप दीर्घकाळ बंद राहणे ही गंभीर बाब ठरत आहे. त्यामुळे वाहनधारकांना सासवड, मोरगाव, सुपे किंवा पुणे येथे जाऊन इंधन भरावे लागत असून वेळ, इंधन व पैशांचे नुकसान होत आहे.
जेजुरी हे तीर्थक्षेत्र, तर सासवड येथे तहसील कार्यालय, न्यायालये व अन्य शासकीय कार्यालये असल्याने दोन्ही ठिकाणे कायम वर्दळीची आहेत. अशा ठिकाणी सीएनजी पंप बंद असणे म्हणजे शासनाच्या पर्यावरणपूरक वाहतूक धोरणालाच हरताळ फासल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जेजुरी व गोटेमाळ येथील सीएनजी पंप तातडीने सुरू करावेत, तसेच भविष्यातील गरज लक्षात घेऊन नवीन सीएनजी पंपांना मंजुरी द्यावी, अशी मागणी सीएनजी वाहनधारक, स्थानिक नागरिक व भाविकांकडून होत आहे.