

उमेश कुलकर्णी
दौंड: शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून, गुन्हेगारांची मजल थेट पोलिस ठाण्याच्या आवारात गोंधळ घालणे, भांडणे करणे आणि पोलिसांशी अरेरावीची भाषा वापरण्यापर्यंत पोहोचली आहे. या गंभीर प्रकारामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
निवडणुकीपूर्वी अनेक समाजकंटकांना तडीपार केले जाईल, असे आश्वासन उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांनी पत्रकार परिषदेत दिले होते; मात्र, हे आश्वासन प्रत्यक्षात हवेतच विरल्याचे चित्र दिसत असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमध्ये तीव नाराजी व्यक्त होत आहे. शहरात किरकोळ कारणांवरून गटातटांत सतत भांडणे होत असून निवडणूक काळात लोकप्रतिनिधींनाही अर्वाच्य भाषेला सामोरे जावे लागले. राजकीय मतभेद असू शकतात, परंतु भर रस्त्यात लोकप्रतिनिधींशी अशा प्रकारची वर्तणूक अयोग्य असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. दौंड शहरात गुटखा, गांजा, नशिले पदार्थ, अवैध धंदे व खासगी सावकारी सर्रास सुरू असून राजकीय वरदहस्तामुळे संबंधित गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. यामुळे अधिकारी, नेते यांनाही अर्वाच्य भाषेत बोलण्याची हिंमत त्यांना होत आहे. पैशाच्या माजामुळे कायद्याची भीतीच उरलेली नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
मोठ्या गुन्ह्यांतील आरोपींना तत्काळ जामीन किंवा अटकपूर्व जामीन मिळत असल्याने कायदा फक्त गोरगरिबांसाठीच आहे का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. दुसरीकडे किरकोळ वादात मात्र पोलिसांकडून तत्काळ कठोर कारवाई केली जाते, ही बाब संशयास्पद आहे. महिला वर्गात भीतीचे वातावरण असून गुंडांविरोधात तक्रार केल्यास उलट खोट्या तक्रारी दाखल केल्या जातात. अशा तक्रारी पोलिस तत्काळ नोंदवतात, हे वास्तवही नागरिक मांडत आहेत. खासगी सावकारांच्या जाळ्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत असून टोकाच्या परिस्थितीची भीती व्यक्त होत आहे.
तत्कालीन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी गांजाविक्रीविरोधात कारवाईचे आदेश दिले होते; मात्र त्यांच्या बदलीनंतर नव्याने रुजू झालेले पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी दौंडकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची चर्चा आहे. वरिष्ठांना चुकीची किंवा अपूर्ण माहिती सादर केली जात असल्याचाही आरोप होत आहे. दौंड शहरातील अशांतता निर्माण करणाऱ्यांवर तातडीने तडीपारसारखी कठोर कारवाई करावी, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी कर्तव्य बजावावे, अशी जोरदार मागणी आता सर्वसामान्य जनतेतून होत आहे. येणाऱ्या काळात पोलिस काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार किंवा दंगली होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी वेळीच कठोर कारवाई केली नाही तर शहरातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असा इशाराही जाणकारांकडून दिला जात आहे.
गंभीर प्रश्न
पोलिस ठाण्याच्या आवारातच गुन्हेगारांचा उच्छाद.
निवडणुकीनंतर मोठ्या हिंसाचाराची शक्यता.
तडीपारचे आश्वासन कागदावरच.
अवैध धंदे, नशिले पदार्थ, खासगी सावकारी वाढीस.
मोठ्या गुन्ह्यांतील आरोपींना सहज जामीन.
महिलांमध्ये भीतीचे वातावरण.
राजकीय दबावाखाली पोलिसांची कारवाई?
कठोर, निष्पक्ष कारवाईची नागरिकांची मागणी