पुण्यात दोन दिवसात महिला लैंगिक अत्याचाराचे पाच गुन्हे दाखल

पुण्यात दोन दिवसात महिला लैंगिक अत्याचाराचे पाच गुन्हे दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मुलीवर चाकुने वार केले असतानाची घटना ताजी असतानाच दोन दिवसातच शहरात विविध पोलिस ठाण्यात महिला लैंगिक अत्याचारा संबधी 5 गुन्हे दाखल झाले आहेत.

प्रेम प्रकरणातून औरंगाबाद येथील तरूणाने तरूणीचे नग्न अवस्थेतील फोटो व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वारंवार तिच्याकडे अश्लिल फोटोची मागणी केल्यानंतर तिने त्याला ब्लॉक केल्यानंतर त्याने हा प्रकार केल्याचे पीडित मुलीने दिलेल्या जबाबात नमूद करण्यात आले आहे. याबाबत 20 वर्षीय तरूणीने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकी क्षिरसागर (22, रा. औरंगाबाद) याच्यावर याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै 2021 ते मार्च 2022 दरम्यान शहरात विविध ठिकाणी घडला.

अल्पवयीन मुलीवर अल्पवयीनाचा बलात्कार

दुसर्‍या घटनेत एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 3 सप्टेंबर 2021 ते नोव्हेंबर 2021 दरम्यान घडला. खडक पोलिस ठाण्यात हा गुन्हा बंडगार्डन पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

तिसर्‍या घटनेत स्वतःची ओळख लपवून धानोरी येथील 45 वर्षीय अजय भुवन मिश्रा याने इन्स्ट्राग्रामवर वेगवेगळे बनावट अकाउंट तयार केले. तसेच मुलीशी अश्लिल भाषेत बोलून इन्स्ट्राग्रामवर त्याचे फोटो अपलोड करीत मुलीला मॅसेज केले. तसेच तिचा वेळोवेळी पाठलाग केला. हा प्रकार मे 2021 ते डिसेंबर 2021 दरम्यान घडला. याबाबत पीडित मुलीच्या आईने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार; आरोपीसह कुटुंबियांवर गुन्हा

लग्न करणार असल्याचे सांगून तरूणीवर बलात्कार करणार्‍या व नंतर लग्नास नकार देणार्‍या तरूणासह त्याच्या घरच्यांवर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील रौदाळे, अयण रौदाळे, कविता रौदाळे (रा. खंडोबानगर, बारामती) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत एका 24 वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे. डिसेंबर 2018 ते जानेवारी 2022 दरम्यान हा प्रकार सुरू होता. आणखी एका घटनेत कोंढव्यातील 19 वर्षीय तरूणीला इन्ट्राग्राम वरून अश्लिल मेसेज आणि अश्लिल फोटो पाठवून तिचा विनयभंग करणार्‍या अमर विजयकुमार जाधव (25, रा. बावधन) याच्या विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 11 मार्च ते 14 मार्च दरम्यान घडला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news