सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय अजेंडा निश्चित करण्याचे काम ; सोनिया गांधींचा गंभीर आरोप | पुढारी

सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय अजेंडा निश्चित करण्याचे काम ; सोनिया गांधींचा गंभीर आरोप

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय अजेंडा निश्चित केला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी लोकसभेत केला. राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून फेसबुक, ट्विटरसारख्या जागतिक मीडियाचा वापर आपापला अजेंडा निश्चित करण्यासाठी केला जात असून सोशल मीडियाच्या वापरामुळे हॅकिंगचा धोकादेखील वाढला असल्याचे गांधी यांनी नमूद केले.

सोशल मीडियाचे नियंत्रण करणाऱ्या कंपन्या सर्व पक्षांना समान संधी देत नसल्याचे दिसून आले आहे, असे सांगत सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, सत्तेत असलेल्या लोकांशी हातमिळवणी करून फेसबुकद्वारे सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. देशाच्या लोकशाहीसाठी हे घातक आहे. विविध देशातील सत्तारूढ पक्ष आणि जागतिक सोशल मीडियाचे दिग्गज यांच्यादरम्यान युती झाल्याचे एक अहवाल सांगतो. अशा स्थितीत फेसबुकसहित इतर सोशल मीडियाचा भारतीय व्यवस्थांमधील प्रभाव आणि हस्तक्षेप समाप्त करावा, असा आग्रह आपण केंद्र सरकारला करतो.

सत्तेत कोणीही असो, मात्र आपणास आपल्या लोकशाहीचे व सामाजिक सद्भावाचे संरक्षण करावेच लागेल, असे सांगत गांधी यांनी सोशल मीडियामुळे निर्माण झालेल्या धोक्यांकडे गंभीरतेने पाहण्याची वेळ आली असल्याची टिप्पणी केली.

हे ही वाचलं का ?

Back to top button