महंमदवाडी- उरुळी देवाची भागात बंडखोरी थोपविण्याचे आव्हान

महंमदवाडी- उरुळी देवाची भागात बंडखोरी थोपविण्याचे आव्हान

सुरेश मोरे / विकास भागिवंत

फुरसुंगी / कोंढवा : प्रभागाचा प्रचंड विस्तार, एकाच गावातील तीन विद्यमान नगरसेवक, महिला व अनुसूचित जाती आरक्षण तसेच महंमदवाडी, उंड्री, उरुळी देवाची, फुरसुंगी यांसारखी मोठी गावे, इच्छुकांची मोठी संख्या या सर्व गोष्टींचा ताळमेळ साधताना इथे बंडखोरी थोपविण्याचे आव्हान पक्षश्रेष्ठींपुढे असणार आहे.

जुन्या महंमदवाडी कौसरबाग (प्रभाग 26) प्रभागातील काळे बोराटेनगर, एनआयबीएम व कौसरबाग भाग वगळून महंमदवाडी-उरुळी देवाची प्रभाग क्रमांक 46 ची निर्मिती करण्यात आली आहे. पूर्वीच्या महंमदवाडी-कौसरबाग या प्रभागातून शिवसेनेचे प्रमोद भानगिरे, प्राची आल्हाट, भाजपचे संजय घुले, राष्ट्रवादीच्या नंदा लोणकर निवडून आल्या होत्या. आता कौसरबाग वगळण्यात येऊन समाविष्ट गावे या प्रभागास जोडण्यात आली आहेत. त्यामुळे आता एकट्या महंमदवाडी गावात सध्या विद्यमान तीन नगरसेवक असल्याने नव्याने समाविष्ट गावांतील इच्छुकांची राजकीय गणिते बिघडली आहेत.

खुल्या वर्गात वाढणार चुरस

या प्रभागात अनुसूचित जातीसाठी एक संभाव्य आरक्षण पडण्याची शक्यता असल्यामुळे खुल्या वर्गात चुरस वाढली आहे. समाविष्ट गावात राष्ट्रवादीच्या बरोबरीने शिवसेनेचीही ताकद आहे. महाविकास आघाडी झाल्यास या ठिकाणी काँग्रेस उमेदवारांनाही नगरसेवकपदाची संधी आहे. गेल्या काही वर्षांत या परिसरात झालेल्या नागरीकरणामुळे नवीन सोसायट्यांचा भाग झाला आहे. भाजप इच्छुकांनी केलेल्या जोरदार तयारीमुळे आघाडीला येथील निवडणूक सोपी नाही.

बंडखोरीची शक्यता वाढली

या प्रभागातून इच्छुकांची सर्वाधिक संख्या असल्याने बंडखोरीची मोठी शक्यता आहे. त्यामुळे तिकीट वाटप पक्षश्रेष्ठींसाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यातच बहुतांश इच्छुकांचे प्रत्येक गावात नातेसंबंध असल्याने पक्षापेक्षा आपल्याला जवळचा व नातेसंबंध हा घटकही परिणामकारक ठरणार आहे. राष्ट्रवादीकडून सचिन घुले पाटील, निवृत्ती बांदल, संजय जाधव, कलेश्वर घुले, मनोज घुले, संतोष सरोदे, महेंद्र सरोदे, सुरेखा भगवान भाडळे, संजय बबन घुले, प्रशांत भाडळे, उमेश कोंढाळकर, सनी शेवाळे; तर शिवसेनेकडून विद्यमान नगरसेवक प्रमोद भानगिरे, प्राची आल्हाट, उल्हास शेवाळे, बाळासाहेब हरपळे, सुभाष घुले, शुभांगी शाश्वत घुले, स्वाती टकले, राजीव भाडळे, सोमनाथ क-हे, किरण सरोदे इच्छुक आहेत.

काँग्रेसकडून कांचन संदीप बांदल, अमित घुले; तर भाजपकडून संजय तात्या घुले, राजेंद्र भिंताडे, सचिन हांडे, अतुल तरवडे, संदीप हरपळे, सचिन घुले, हनुमंत घुले, कार्तिकी घुले, वैशाली पवार, धनंजय कामठे, स्वाती कुरणे; तर अपक्ष म्हणून विकास
भाडळे, रवींद्र झांबरे इच्छुक निवडणुकीची तयारी करीत आहेत. समाविष्ट गावांत पाण्याची मोठी समस्या असून, त्याचबरोबर वाहतूक कोंडी, वाढीव कर, अरुंद रस्ते, अपुर्‍या नागरी सुविधांबरोबरच भाजीमंडई, क्रीडांगणे, उद्याने, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव आहे.

अशी आहे प्रभागरचना

महंमदवाडी, औताडेवाडी, हांडेवाडी, होळकरवाडी, न्यू इंग्लिश स्कूल, वाडकरमळा, पुण्यधाम आश्रम, डॉ. आंबेडकरनगर, उंड्री, कडनगर, वडाचीवाडी, पाटीलनगर, धनगरवस्ती, देवाची उरुळी, आदर्शनगर, फुरसुंगी गावठाण.

  • एकूण लोकसंख्या : 56,047
  • अनुसूचित जाती : 8,262
  • अनुसूचित जमाती : 788

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news