पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील खासगी व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे संस्थास्तरावरील प्रवेश हे नियमबाह्य पद्धतीने झाल्यास, संबंधित सर्व प्रवेश रद्द करण्यात येतील, असे निर्देश राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे (सीईटी सेल) आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिले आहेत. सीईटी सेलकडून इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए, एमसीए अशा विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश फेर्यांच्या (कॅप राऊंड) माध्यमातून राबविण्यात येते. या फेर्यानंतर उर्वरित राहणार्या जागा तसेच व्यवस्थापन कोट्यातील जागांचे प्रवेश हे संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रियेद्वारे होणे गरजेचे आहेत.
या प्रवेशांसाठी महाविद्यालयांनी जाहिरात प्रसिद्ध करून, त्याची माहितीपत्रकाद्वारे महाविद्यालयांच्या दर्शनी भागात लावणे गरजेचे आहे. प्रवेशासाठी आलेल्या अर्जांतून, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची यादी करणे आवश्यक आहे. यामध्ये सर्वाधिक गुण मिळणार्या विद्यार्थ्यांला प्रवेशासाठी प्राधान्य देणे गरजेचे असतानाच, महाविद्यालयांकडून नियमावलीची मोडतोड करून लाखो रुपयांचे डोनेशन देणार्या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्यात येत आहे. या प्रकारांमुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.
या विरोधात युवा सेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनी सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर वारभुवन यांनी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकानुसार महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था नियम 13 मधील तरतुदींनुसार काटेकोरपणे होईल, याची दक्षता घेण्यात यावी. संस्थास्तरावरील प्रवेश हे नियमबाह्य पद्धतीने घेतल्याचे सिद्ध झाल्यास, संबंधित प्रवेश हे प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या स्तरावर रद्द होतील, याची जाणीव करून देण्याच्या सूचना तंत्रशिक्षण संचालनालयाचे (डीटीई) संचालक डॉ. विनोद मोहितकर यांना दिले आहेत.
महाविद्यालयांनी शिक्षणाद्वारे थेट व्यवसाय सुरू केला आहे. कॅप राऊंड होण्यापूर्वी 'रेट कार्ड' प्रसिद्ध करीत संस्थास्तरावरील प्रवेश पूर्ण करून भ्रष्टाचार करत आहेत. महाविद्यालयांना निवेदन देऊन भ्रष्टाचार थांबवण्याची विनंती केली आहे. मात्र, भ्रष्टाचार सुरू राहिल्यास युवासेना लढाई लढून सामान्य विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देईल.
– कल्पेश यादव, राज्य सहसचिव, युवासेना.
हेही वाचा