गोवा : बाणास्तरी येथे कारच्या धडकेत तिघे जागीच ठार | पुढारी

गोवा : बाणास्तरी येथे कारच्या धडकेत तिघे जागीच ठार

फोंडा, पुढारी वृत्तसेवा : फोंड्याहून पणजीच्या दिशेने जाणार्‍या मर्सिडिझने तीन कारगाड्या व दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने तिघे ठार तर अन्य चारजण जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि.७) रात्री आठच्या सुमारास झाला. चुकीच्या मार्गाने मर्सिडिझ कारगाडी आल्याने हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील सुरेश फडते (वय ५८), भावना फडते (वय ५२, दोघेही रा. दिवाडी) हे पती-पत्नी ठार झाले. तर दुसर्‍या दुचाकीवरील अनुप कर्माकर (२६, रा. फातोर्डा) हा ठार झाला.

अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मर्सिडिझ कार गाडीतील चालकाने अपघात स्थळाहून पळ काढला. कारचालक दारुच्या नशेत असावा, असा संशय प्रत्यक्षदर्शी लोकांनी व्यक्त केला असून कारमध्ये दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत. या अपघातात तीन वाहनांचा चक्काचूर झाला. अपघातग्रस्त दुचाकीवर स्वार भावना फडते या वाहनाच्या धडकेत उसळून पुलाच्या खाली पडल्या व जागीच ठार झाल्या.
अपघातानंतर वाहने धडकण्याचा मोठा आवाज, किंचाळ्या आणि आरडाओरडा यामुळे लगतचे लोक धावून आले. रस्त्यावरील वाहन चालकांनी व घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी मदतकार्यात भाग घेतला. भोमचे सरपंच, पंचसदस्य व इतरांनीही घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बांबोळी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button