

पुणे: बारावीची परिक्षा महिन्यावर आली असताना परीक्षेचे हॉलतिकीट कधी मिळणार, असा प्रश्न विद्यार्थी विचारत होते. यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हॉलतिकीट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवार दि. 12 पासून महाविद्यालयांच्या लॉगीनवर हॉलतिकीट उपलब्ध केले जाणार असून, विद्यार्थ्यांना कोणतेही वेगळे शुल्क न देता महाविद्यालयांमार्फत प्राप्त करता येतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली आहे.
डॉ. माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालकांना फेबुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचे हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
त्यानुसार परीक्षेचे हॉलतिकीट ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या https://www.mahahsscboard.in/mr या वेबसाईटवर कॉलेज लॉगीनमध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील. यासंदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
महाविद्यालयांनी हॉलतिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. हॉलतिकीट ऑनलाईन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. हॉलतिकीटची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा, प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी. हॉलतिकीटमध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यायच्या आहेत.
हॉलतिकीटवरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव यासंदर्भातील दुरुस्त्या ऑनलाईन करून घेता येणार आहेत. हॉलतिकीट विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे. अशा स्पष्ट सूचना डॉ. माळी यांनी दिल्या आहेत.