

पौड: मुळशी तालुक्यातील कोळवणमधून पुढे वाळेण व डोंगरगाव या गावांना जोडणारा पूल पाटबंधारे विभागाने शुक्रवारी (दि.9) तोडला. यामुळे कोळवणपासून पुढे डोंगरगाव गावठाण व वाळेण या गावांचा संपर्क तुटला आहे. कोळवण विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेजारीच असलेल्या छोट्या साठवण बंधाऱ्यावरून धोकादायक पद्धतीने उड्या मारत नदी पार केली.
पाटबंधारे विभागाने पूल तोडण्याच्याआधी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने येथून पर्यायी रस्त्याची व्यवस्था करायला हवी होती. परंतु, ती करण्यात आलेली नाही. येथे पर्यायी रस्ता उपलब्ध आहे. परंतु, मातीतून गाडी चालवावी लागते. तसेच अंतरसुद्धा चार किलोमीटरने वाढते. शासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी नवीन पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी स्थानिक ग््राामस्थांनी केली आहे.
कोल्हापूर पद्धतीचा हा बंधारा होता. त्याचा वापर रहदारीसाठी होत होता. हा बंधारा धोकादायक स्थितीत होता. तो कधीही कोसळेल अशी स्थिती होती. जुलै महिन्यातच हा बंधारा पाडावा, असे आदेश वरिष्ठांनी दिले होते. सुमारे पाच महिन्यांच्या विलंबाने या बंधाऱ्याचा वरचा स्लॅब तोडला आहे.
सुरेश कोंढरे, कर्मचारी, पाटबंधारे विभाग
वाळेण रस्त्यावरील पूल तोडल्याने पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यासाठी शुक्रवारी कोळवण येथे पाहणी करण्यासाठी गेलो होतो.
विजयकुमार चोबे, तहसीलदार, मुळशी