

बारामती : सोनगाव (ता. बारामती) येथे सरपंच महिलेच्या पतीचा खून केल्याच्या खटल्यात आरोपी पनिश उर्फ पांग्या आनंद्या भोसले (रा. सोनगाव) याला येथील जिल्हा न्यायाधिश व्ही. सी. बर्डे यांनी जन्मठेप (आजन्म कारावास) व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
बारामती तालुक्यातील सोनगाव येथे युवराज आबासो थोरात यांचा १५ जानेवारी २०२० रोजी पांग्या याने खून केला होता. गावातील महिला संक्रातीनिमित्त कऱ्हा-निरा नदीचा संगम असलेल्या सोनेश्वर मंदिर येथे ओवासणीसाठी आल्या होत्या. युवराज थोरात हे दर्शन घेण्यासाठी थांबले होते. त्यांच्या कुटुंबातील लोक त्यांच्यासोबत होते.
यावेळी पनिश उर्फ पांग्या भोसले याने युवराज थोरात यांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांना धक्काबुक्की सुद्धा करण्यात आली. तुझी बायको सरपंच असल्यामुळे तुम्हाला लय माज आलाय का, असे म्हणून त्याने युवराज थोरात यांना धक्का मारून खाली पाडले. स्वतःच्या कमरेला असलेला चाकू काढून थोरात यांच्या छातीमध्ये खुपसला. या घटनेत थोरात यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी पांग्या भोसले विरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यात सरकार पक्षाकडून अॅड. ज्ञानदेव शिंगाडे यांनी काम पाहिले. सरकार पक्षाकडून १३ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदार व तपास अधिकारी यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. शिंगाडे यांनी केलेला युक्तिवाद व इतर साक्षीदारांचे जबाब ग्राह्य धरून न्यायालयाने खून प्रकरणी पांग्या भोसले याला जन्मठेप व तीन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद तसेच कलम ५०४ अन्वये एक वर्षाची शिक्षा ठोठावली.
या खटल्यात सरकार पक्षाला पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तपास अधिकारी अण्णासाहेब घोलप, प्रमोद पोरे, न्यायालय पैरवी अधिकारी गोरख कसपटे, महिला अंमलदार रेणुका पवार यांनी सहकार्य केले. सरकार पक्षाला या खटल्यात अॅड. विनोद जावळे, अॅड. परिश रुपनवर, विश्वतेज थोरात यांचेही सहाय्य मिळाले.