पिंपरी : घरफोड्या करणारा केआर टोळीचा म्होरक्या जेरबंद

पिंपरी : घरफोड्या करणारा केआर टोळीचा म्होरक्या जेरबंद

पिंपरी(पुणे) : शहर परिसरात दरोडा, जबरी चोरी आणि घरफोड्या करणार्‍या केआर टोळीच्या म्होरक्यासह तिघांना दरोडाविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 12 लाख 11 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. किरण गुरुनाथ राठोड (26, रा. दिघी), अर्जुन कल्लप्पा सूर्यवंशी (19, रा. कोरेगाव भीमा), संतोष जयहिंद गुप्ता (18, रा खंडोबा माळ, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहर परिसरात मागील अनेक महिन्यांपासून घरफोड्या करणारा केआर टोळीचा म्होरक्या दिघी परिसरात ओळख लपवून वास्तव्य करीत असल्याची माहिती दरोडाविरोधी पथकातील दिवंगत पोलिस अंमलदार राजेश कौशल्ये यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी दिघी परिसरात सापळा लावून किरण राठोड याच्यासह तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक कार, 187 ग्रॅम सोने, एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, असा एकूण बारा लाख 11 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

चोरीचे दागिने घेणारे सराफही अडचणीत

आरोपी किरण राठोड हा पाच घरफोड्या आणि एक दरोड्याच्या गुन्ह्यात फरार होता. आरोपींनी चोरलेल्या दागिन्यांची कोरेगाव भीमा आणि परभणी येथे विक्री केली. त्यानुसार, पोलिसांनी संबंधित सराफ व्यावसायिकांनादेखील आरोपी केले आहे. तसेच, दागिन्यांची विक्री करण्यासाठी मदत करणार्‍या एका साथीदारालादेखील पोलिसांनी गुन्ह्यात आरोपी केले आहे.

यांनी केली कामगिरी

पोलिस उपआयुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त सतीश माने, सहायक आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, सहायक पोलिस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलिस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलिस अंमलदार राजेश कौशल्ये, सुमित देवकर, गणेश सावंत, विनोद वीर, आशिष बनकर, गणेश हिंगे, गणेश कोकणे, उमेश पुलगम, समीर रासकर, अमर कदम, महेश खांडे, नितीन लोखंडे, सागर शेडगे, राहुल खारगे, चिंतामण सुपे, औदुंबर रोंगे, नागेश माळी, पोपट हुलगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

राजेश आज हवा होता…

शहर परिसरात दरोडा, जबरी चोरी आणि घरफोड्या करणार्‍या केआर टोळीच्या म्होरक्यासह तिघांना अटक करण्यात दरोडाविरोधी पथकाचे दिवंगत पोलिस अंमलदार राजेश कौशल्ये यांचा सिंहाचा वाटा होता. राजेश यांना मिळालेल्या खबरीवरूनच सापळा रचून आरोपींना जेरबंद करण्यात आले. मात्र, दरम्यानच्या काळात राजेश कौशल्य यांचे अपघाती निधन झाले. गुरुवारी (दि. 17) पोलिस आयुक्त कार्यालयात या कामगिरीबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. त्या वेळी दरोडाविरोधी पथकातील सहकार्‍यांना राजेश यांच्या आठवणी दाटून आल्या. कामगिरीबाबत वरिष्ठ कौतुक करीत असताना मराजेश आज हवा होताफ, अशाच भावना सहकारी पोलिस करीत होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news