चिखलीत वाढल्या गढूळ पाण्याच्या तक्रारी | पुढारी

चिखलीत वाढल्या गढूळ पाण्याच्या तक्रारी

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिखलीतील देहू-आळंदी रस्ता येथील काही सोसायट्यांना सध्या मैलामिश्रित दूषित पाणी येत आहे. त्यामुळे सोसायटीत राहणार्‍या नागरिकांना विविध जलजन्य आजारांची बाधा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. चिखली येथील देहू-आळंदी रस्त्यावरील अभंग विश्व फेज-1, अभंग विश्व फेज-2, मीरा ऑर्किड, भागीरथी ग्लोरिया, गवारे अंगण आदी सोसायट्यांमधे मैलामिश्रित पाणी येत आहे.

या सर्व सोसायट्यांमधील लहान मुले, महिला, वयोवृद्ध नागरिक त्यामुळे त्रस्त झाले आहेत. त्यांना जुलाब, उलट्या असे आजार होत आहेत. या भागामध्ये जाणारी ड्रेनेज लाईन आणि महानगरपालिकेची जलवाहिनी एकावरून एक जात आहे. त्यामुळे ड्रेनेजलाईनचे पाणी जलवाहिनीमध्ये मिसळत आहे. याबाबत चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने आयुक्त
शेखर सिंह यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

याबाबत फेडरेशनकडून महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले तसेच ड्रेनेज विभागाचे अधिकारी यांनादेखील कळविण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे या परिसरातील सुमारे 4 हजार नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असे फेडरेशनने स्पष्ट केले आहे.

स्वच्छ पाणीपुरवठा करा

परिसरातील सोसायट्यांमध्ये नेमके कशामुळे गढूळ पाणी येत आहे, याचा शोध घेण्यात यावा. जोपर्यंत पूर्ववत स्वच्छ पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत महापालिकेकडून या भागातील सोसायटीधारकांना टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करावा. तसेच, येथील ड्रेनेज लाइन आणि पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी तपासून त्या परत व्यवस्थित टाकण्यात याव्या. तसेच, नागरिकांना व्यवस्थित आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे

परिसरात स्ट्रॉम वॉटर आणि ड्रेनेज लाइनमध्ये चोकअप झाले आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. येथील काही सोसायट्यांच्या पाइपलाइन बदलणे, चेंबर दुरुस्ती आदी कामे केली जात आहेत.

– रामनाथ टकले,
कार्यकारी अभियंता

हेही वाचा

नाशिकमध्ये डोळ्यांच्या साथीमुळे ३१ ऑगस्टपर्यंत उद्याने बंद

मोहननगर, उद्याननगर गृहप्रकल्पांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

आयपीएस अधिकारी निलंबित; पबमध्ये महिलेशी गैरवर्तन भोवले

Back to top button