देहूगाव : एकाच जमिनीची दोघांना विक्री | पुढारी

देहूगाव : एकाच जमिनीची दोघांना विक्री

देहूगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : एकाच जमिनीची दोघांना विक्री करण्याचा प्रकरण समोर आला असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश वडगाव न्यायालयाने तळेगाव पोलिस स्टेशनला दिले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे . मावळ तालुक्यातील ढोणे गावमध्ये भीमराव वाघमारे, नामदेव वाघमारे, उमाजी वाघमारे आणि बबाबाई आगळे यांच्या मालकीची गट क्र.153 मध्ये 1 हेक्टर 50 आर जमीन आहे. त्यापैकी 30 गुंठे जागा दत्तू सोळुंके व दिलीप सोळुंके यांना खरेदी खत करून विकली होती.

त्याचे नोंदीत खरेदी खतही करून देण्यात आले होते. हा प्रकार सन 2007 ला घडला होता. त्यानंतर वाघमारे बंधूंनी हीच 30 गुंठे जागा महेंद्र गंगावणे (रा. चिखली) यांना, 27 जून 2016 रोजी विकली. त्या जमिनीचे खरेदी खतही करून दिले. त्यापोटी महेंद्र गंगावणे यांनी 30 गुंठे जमिनीची किंमत रुपये 6 लाख धनादेश व डीडीद्वारे वाघमारे यांना अदा केले.

दरम्यान, महेंद्र गंगावणे हे खरेदी केलेल्या जमिनीची नोंदणी करण्यासाठी तलाठी कार्यालयात गेले असता, या जमिनीची पहिली नोंदणी झाली होती. तर वाघमारे कुटुंबीयाने आपली फसवणूक केल्याचे गंगावणे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी फसवणूक करणार्‍या विरुद्ध 9 सप्टेंबर 2021 रोजी तळेगाव पोलिस ठाण्यात तक्रार केली.

मात्र, तळेगाव पोलिसांनी काहीच या तक्रारीची दखल घेतली नाही, त्यामुळे महेंद्र गंगावणे यांनी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात धाव घेतली. मात्र तेथेही काहीच हाती लागले नाही. शेवटी अ‍ॅड. अनिल चव्हाण यांच्या मदतीने वडगावमधील फौजदारी न्यायालयात त्यांनी खटला दाखल केला. वडगाव न्यायालयाने भीमराव वाघमारे आणि इतरांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिले.

मावळ तालुक्यात मागासवर्गीयांच्या गरिबी आणि अशिक्षितपणाचा अनेक लँडमाफिया गैरफायदा घेत आहेत. ठाकर, मातंग, बौद्ध यांच्या जमिनी अगदी कवडीमोल किंमतीत घ्यायच्या, त्याचा थोडाफार मोबदला द्यायचा आणि दमदाटी, भाईगिरी करून बाकीची रक्कम न देता बुडवायची, असे प्रकार घडत आहेत. असे होऊ नये म्हणून मागासवर्गीय लोकांनी आपली जमीन विक्री करताना किंवा खरेदी करताना चार लोकांना मध्यस्थी घेऊन, संपूर्ण माहिती घेऊन, कागदपत्रांची पक्की खात्री करूनच जमिनीचे व्यवहार करावेत. म्हणजे फसवणूक होऊन मनस्ताप होणार नाही.

– अ‍ॅड. अनिल चव्हाण, वकील

Back to top button