जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर रविवारी (दि. ७) गुरुदेव दत्त भक्त परिवाराच्यावतीने आरोग्य तसेच विश्व शांतीसाठी भैरवचंडी यज्ञ हवन करण्यात आले. श्री गुरुदेव दत्त भक्ती परिवाराचे गुरुवर्य अविनाशदादा बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो अनुयायी जेजुरी गडावर उपस्थित होते.
रविवारी पहाटेपासूनच या विधीसाठी राज्याच्या विविध भागातून शिष्यगण उपस्थित होते. जेजुरी गडावर खंडोबा मंदिरावरील रंगमहालात होम हवन करण्यात आले. या प्रसंगी श्री मार्तंड देव संस्थांनचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे, माजी विश्वस्त संदीप घोणे, पुणे परिवारासह उपस्थित होते. यावेळी शेकडो अनुयायांनी 'गुरुदेव दत्त' आणि 'येळकोट येळकोट जय मल्हार'चा गजर केला.
विश्वातील सध्याच्या काळात आरोग्य विषयक समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे, तसेच निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित संकटाचे निवारण ईश्वर व धार्मिक आचरणानेच होऊ शकते. सध्या जगभरातील नागरिक अस्वस्थ झाले आहेत, त्यामुळे कुलधर्म कुलाचाराच्या माध्यमातून आपल्या कुलस्वामीला आवाहन करत या यज्ञाचे आयोजन जागतिक विश्व आरोग्य, शांतीसाठी आणि पर्यावरण संवर्धनाकरिता करण्यात आल्याची माहिती यावेळी दादाश्री बडगुजर यांनी दिली.
यावेळी संदीप घोणे, महेश आगलावे, गणेश आगलावे यांनी खंडोबा देवाविषयक माहिती भाविकांना दिली. रविवार सुट्टीमुळे भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवर्य दादाश्री बडगुजर यांचे अनुयायी अभिरुची पारेख, पूनम राऊत, रूपाली आगलावे, प्रियंका कांचन, महेश आगलावे, निलेश तिवटे, वरद राऊत आदींनी केले.