

पुणे : प्रसाद जगताप : पुणे विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या 2014-15 मध्ये 41 लाख 90 हजार 509 इतकी होती. आता 2020-21 मध्ये यात तब्बल 40 लाखांनी वाढ झाली असून, आता प्रवाशांची संख्या 81 लाख 64 हजार 840 झाली आहे.
विमानतळाने प्रवासीसंख्येत आणि त्यातून मिळणार्या उत्पन्नात 'हाय जम्प' मारल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, विमानतळावरून होणार्या मालवाहतुकीतही वाढ होत असून, त्याद्वारेसुद्धा पुणे विमानतळाच्या उत्पन्नात वाढ होत आहे.
संरक्षण दलाच्या 42.45 एकर जागेत पुणे विमानतळ वसलेले आहे. येथूनच 10 किलोमीटर अंतरावर पुणे रेल्वे स्टेशन आहे. तरीही पुणे विमानतळाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोनापूर्वी पुणे विमानतळावरून रोज 160 विमानांची देशांतर्गत उड्डाणे होत होती. त्यातील दुबईसाठी दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणे होत होती. मात्र, कोरोनाकाळात ही सेवा 12 तासांची झाली आणि आंतरराष्ट्रीय विमानांची सेवा बंद करण्यात आली. विमानतळ प्रशासनाने नुकतीच विमानसेवा 24 तासांची केली आहे. मात्र, पुण्यातून दुबईसाठी होणारे आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण बंद आहे.
अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, गोवा, हैदराबाद, इंदूर, जयपूर, कोचीन, कोलकाता, मुंबई, नागपूर, लखनऊ, भोपाळ, नाशिक, तिरुपती, इंदूर, ग्वाल्हेर, जबलपूर, प्रयागराज, बेळगाव या शहरांसाठी पुणे विमानतळावरून विमानांची उड्डाणे होतात. हे विमानतळ देशांतर्गत विमानसेवा पुरविणारे 10 वे सर्वात व्यग्र विमानतळ आहे.
इंडिगो, स्पाईस जेट, गो एअर, एअर एशिया, अॅलियान्स एअर, विस्टारा, एअर इंडिया
''पुणे विमानतळावर प्रवाशांची संख्या वाढत आहे, ही चांगली गोष्ट आहे. विमानतळाच्या प्रवासीसंख्येसह विमानतळाचा विकास होत असून, मालवाहतुकीतही मोठी वाढ होत आहे. आगामी काळात नवीन विमानतळ टर्मिनल आणि कार पार्किंग या सुविधांचा फायदा प्रवाशांना होणार आहे.''
– संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ
''पुणे विमानतळावरील प्रवाशांची संख्या वाढत असल्याने विमानतळाचे उत्पन्नदेखील वाढत आहे. प्रवाशांना सहा ते सात खासगी कंपन्या सेवा पुरवितात. त्यातच आता एअर इंडियाचे खासगीकरण मार्गी लागल्यामुळे आगामी काळात नवे चांगले बदल पाहायला मिळतील.''
– धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ व विश्लेषक