संतापजनक : सिलिंडरमधून सर्रास होते गॅस चोरी; महागाईत काळाबाजार जोरात!

संतापजनक : सिलिंडरमधून सर्रास होते गॅस चोरी; महागाईत काळाबाजार जोरात!

पुणे : पुढारी वृत्तसेवा

आपल्याला मिळालेला घरगुती गॅस आपण कधी वजन करून पाहत नाही. कर्मचारी सिलिंडर घरी घेऊन येतो, सिलिंडर 'घरपोच' देण्याचे जास्तीचे पैसे घेऊन निघून जातो. सिलिंडर संपला की पुन्हा ऑनलाइन बुकिंग आणि तीच पद्धत. आपण कधीही सिलिंडरचे वजन मोजून पाहत नाही. परंतु, कात्रजमध्ये अवैधरीत्या रिफिलिंग होत असलेल्या गोडाउनला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर 'सिलिंडरमधून गॅस काढला जातो' ही बाब अधोरेखित झाली आहे.

महागाईच्या झळांनी अगोदरच सर्वसामान्य नागरिक होरपळले आहेत. पुण्यामध्ये कर्मचार्‍याला द्याव्या लागणार्‍या पैशांसह सिलिंडरसाठी सुमारे एक हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामध्ये जर तुम्हाला गॅस काढलेला सिलिंडर मिळत असेल, तर तुमची मोठी फसवणूक केली जातेय, हे उघड आहे. आतापर्यंतच्या घटनांमध्ये काळाबाजार करणार्‍या टोळ्यांकडून घरगुती वापरासाठीच्या गॅसमधून काही प्रमाणात गॅस काढला जात असल्याचे समोर आले आहे. याशिवाय काहींकडून अनधिकृतरीत्या हा व्यवसायच केला जात असल्याचे कात्रजच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. कात्रज येथील घटनेची माहिती पोलिस तपासात पुढे येणार असून, नेमके कशा स्वरूपात काम सुरू होते, याची माहिती तपासानंतर समोर येईल, असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

वजन करून देणे बंधनकारक

गॅसवितरकांनी ग्राहकांना सिलिंडर घरपोच देताना त्याचे वजन करून देणे नियमानुसार बंधनकारक आहे. पुरवठा खात्याच्या नियमाप्रमाणे एजन्सीतून बाहेर पडणारे गॅस सिलिंडर ग्राहकांपर्यंत पोहचविण्याआधी त्याचे वजन करणे बंधनकारक आहे. तसेच घरी गॅस सिलिंडर नेणार्‍या एजन्सीच्या वाहनातही वजन करण्याचे मशिन असायलाच हवे. परंतु, डिलिव्हरी बॉयकडून सिलिंडरचे वजन न करताच ग्राहक स्वीकारतात. गॅस सिलिंडरचे वजन तपासून घेणे हा ग्राहकाचा हक्क आहे. अनेकदा सिलिंडरच्या कमी वजनाबाबत शंका व्यक्त केली, तरीसुध्दा गॅसच्या टाकीचे वजन तपासण्याची तसदी घेत नाही. प्रत्यक्षात वजन कितीही असो, ते तपासणे हे आपल्याच फायद्याचे आहे. आजच्या महागाईच्या काळात गॅस कमी मिळणे, हे अजिबात परवडणारे नाही.

पलटी करून काढला जातो गॅस

कात्रज येथील गॅस स्फोटाच्या दुर्घटनेनंतर अवैधरीत्या गॅस सिलिंडर रिफिलिंगसाठी चोरीच्या मार्गाचा अवलंब केला जात आहे. यामध्ये गॅस सिलिंडर पलटी करून भरलेल्या गॅस सिलिंडरमधून रिकाम्या गॅस सिलिंडरमध्ये गॅस भरण्याचे सर्रास अवैध प्रकार शहरात होत असल्याच्या घटना मागील काही दुर्घटनांमधून समोर आल्या आहेत. यामध्ये एका लोखंडी नोझल पाइपच्या साह्याने एका गॅस सिलिंडरमधून दुसर्‍या गॅस सिलिंडरमध्ये गॅस भरता येतो. सिलिंडर भरण्याची ही बेकायदेशीर पद्धत गॅस चोरीच्या प्रकारात मोडते. यालाच गॅस पलटी मारणे संबोधले जाते. एकातून दुसर्‍या सिलिंडरमध्ये गॅस भरण्यासाठी ऑनलाइन असे पाइपचे नोझल उपलब्ध केल्याचे दिसते. मंगळवारी झालेली दुर्घटना अशाच पध्दतीने सिलिंडर पलटी मारताना झाल्याचे समोर आले आहे. परंतु, ही पध्दत तितकीच धोकादायक असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

नेमके कुणाचे नियंत्रण?

रॉकेलवरील भार कमी करण्यासाठी दोन आणि पाच किलोच्या सिलिंडर विक्रीला शासनाने 2016 मध्ये परवानगी दिली असली, तरी तेल कंपन्यांकडूनच त्यांचा पुरवठा वितरकाला होणे आवश्यक आहे. मात्र, बाजारात विकल्या जाणार्‍या अनेक छोट्या सिलिंडरवर कोणत्याही कंपनीच्या नावाचा पत्ताच नसल्याचे आढळून आले आहे. तसेच, रिकाम्या सिलिंडरला पुन्हा भरण्याचे काम नेमके कुठे होते, याविषयी गोंधळ असल्याचे स्पष्ट होते. शासकीय अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, सिलिंडरचा भरणा कंपनीकडूनच होणे आवश्यक आहे, तथापि पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररीत्या सिलिंडर भरले जात असल्याचे पाहणीत दिसून येते. या सार्‍या व्यवहारांवर नेमके कोणत्या शासकीय यंत्रणेचे नियंत्रण आहे, याचाही उलगडा तेल कंपन्या किंवा शासकीय अधिकारी यांना करता आला नाही.

तुमच्यासाठी हे महत्त्वाचे…

घरगुती वापराच्या सिलिंडरचे वजन 14.2 किलो असते. त्यात 150 ग्रॅम कमी किंवा अधिक गॅस चालतो. मात्र, यापेक्षा कमी किंवा अधिक वजन भरत असेल, तर काहीतरी घोळ असल्याचे समजा. वजन कमी वा जास्त वाटल्यास एजन्सीकडे किंवा पुरवठा अधिकार्‍यांकडे तक्रार करावी. सिलिंडरचे सील उघडून गळती तर होत नाही ना, याची खात्री करायला हवी. टाकीच्या तीन गोलाकार कड्यांपैकी एकावर रिकाम्या सिलिंडरचे आणि त्यात गॅस भरल्यानंतरचे वजन नमूद असते. ते तपासून घेण्यासाठी डिलिव्हरी बॉयकडे मागणी करावी.

कात्रज येथे गॅस भरण्याची प्रक्रिया अवैधरीत्या सुरू होती. संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस तपासामध्ये त्यांनी सिलिंडर कुठून उपलब्ध केले, हे समोर येईल. अन्नधान्य वितरण विभागाचे फिरते पथक आणि पोलिस प्रशासन संयुक्तपणे कारवाई करतात. यापुढील काळात तपासण्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

                                                       – सचिन ढोले, शहर अन्नधान्य वितरण अधिकारी

या कलमाखांली हे गुन्हे
  • 285 : आग तसेच ज्वालाग्रही पदार्थ यांच्याबाबत हयगयीचे वर्तन
  • 308 : सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे – जो कोणी हेतूपूर्वक एखादे कृत्य करतो ज्या कृत्यामुळे जर मृत्यू आला तर तो खून नसलेल्या सदोष मनुष्यवधाला पात्र ठरतो
  • 435 : स्फोटकाशी छेडछाड केल्यामुळे होणारे नुकसान
  • 436 : घर, इमारत यांना धोका पोहचू शकतो हे माहिती असताना स्फोटक पदार्थ बाळगणे
  • 336 : आततायीपणामध्ये वैयक्तिक सुरक्षेला धोका पोहचविणे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news