पुढील ईडीची धाड माझ्यावर असेल, स्वागतासाठी तयार : नाना पटोले | पुढारी

पुढील ईडीची धाड माझ्यावर असेल, स्वागतासाठी तयार : नाना पटोले

मुंबई : पुढारी ऑनलाईन

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कसून ५ तास चौकशी करण्यात आलीय. सतीश उके यांच्या नागपूर येथील घराची ईडीकडून झाडाझडती सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. पुढील ईडीची धाड माझ्यावर असेल तर मी स्वागतासाठी तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पटोले म्हणाले, मविआमध्ये नाराजी नाही, भाजपच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. देश वाचवण्यासाठी आम्ही लढत राहणार आहोत. भाजपकडून देशात लोकशाही धोक्यात आणण्याचं काम सुरु आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मजबूत आहेत. खोटे गुन्हा दाखल करून ईडीच्या कारवाया सुरू आहेत. यासाठी भाजपकडून मोठ्या प्रमाणावर केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातोय. बनावट दस्ताऐवज तयार करून फसवले जात आहे.

नागपूर येथील वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. याआधी सतीश उके यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. यामुळे ते चर्चेत आले होते. फडणवीस यांच्या विरोधातील याचिकेत सतीश उके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांची बाजू मांडली होती.

Back to top button