

पुणे: यंदा अल-निनोमुळे देशात अन् राज्यात दुष्काळी स्थिती असली, तरीही गणेशोत्सवाने बाजाराला प्रचंड तेजी दिली अन् आर्थिक चक्र वेगाने फिरवले आहे. असोचेम, कॅट आणि सीएमआयसारख्या अर्थविश्लेषक संस्थांनी दिलेल्या अहवालातून हे चित्र दिसत आहे. गत पंधरा दिवसांत देशात दीड लाख कोटी, तर राज्यात ६५ ते ७० हजार कोटींची उलाढाल झाली आहे. तरुणाईने केलेली आयफोनची विक्रमी खरेदी हे या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरले.
देशाच्या ३९ टक्के भागांत पाऊस कमी झाला, तर महाराष्ट्रात २० जिल्ह्यात दुष्काळ आहे. त्यामुळे यंदा दुष्काळाचे सावट बाजारात दिसेल अशी चिंता होती. मात्र, लाडक्या बाप्पासाठी पदरमोड करीत समाजातील सर्वच आर्थिक गटातील नागरिकांनी गणेशोत्सवात पैसा खर्च केला.
लाडक्या बाप्पासाठी होऊ दे खर्च म्हणत आपल्या ऐपतीनुसार खेरदी केली. यात कुटीर, लघु, मध्यम उद्योगांसह मोठ्या उद्योगांना बाळसे या उत्सवाने दिले. गेल्या वर्षाच्या तुलनेत बाजारपेठेत तब्बल ८ ते १५ टक्क्यांची प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे.
अशी झाली आर्थिक उलाढाल...(कोटी रु.)
इव्हेंट -------मंडप, सजावट-----१२ ते १५ हजार
वाहन बाजार---दुचाकी -चारचाकी----८ ते १० हजार
व्यावसायिक वाहने ---ट्रॅक्टर,ट्रक,इतर----५ ते १०हजार
सराफा --------सोने, चांदी, हिरे---७ ते १० हजार
कपडा ------- पारंपरिक वस्त्रे---- ६ ते १० हजार
स्मार्टफोन, आयफोन------------ ६ ते १० हजार
फुले, मिठाई (मोदक) व फराळ--------४ ते ५ हजार
पूजा साहित्य------------------------ २ हजार
लाखोंना रोजगार मिळाला...
राज्यात यंदा हजारो लहान-मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी भव्य देखावे साकारले. मंडप कंत्राटदार, विद्युत सजावट (रोषणाई) तंत्रज्ञ, मूर्तिकार, रंगारी आणि ढोल-ताशा पथके यांच्या माध्यमातून हजारो हातांना रोजगार मिळाला.
केवळ मुंबई आणि पुणे येथील इव्हेंट मॅनेजमेंटनेच हजारो कोटींचा टप्पा गाठला.
गणेश चतुर्थी आणि गौरी आवाहनाच्या मुहूर्तावर हजारो नवीन वाहने रस्त्यावर उतरली. व्यावसायिक कामांसाठी लागणारी चारचाकी वाहने (पिकअप, टेम्पो) आणि तरुणाईची पसंती असलेल्या दुचाकींच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के वाढ झाली.
सराफा बाजाराला झळाळी : बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यासाठी सोन्याचे मुकुट, चांदीचे मोदक, दुर्वा आणि मानवी खरेदीसाठी हिऱ्यांच्या दागिन्यांची मागणी वाढली.