पुणे : पुढारी वृत्तसेवा
पदभरतीतील निष्काळजीपणा, गोपनीयतेचा केलेला भंग, अनैतिक व बेकायदेशिर कृत्यामुळे झालेल्या महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) च्या बदनामी प्रकरणी बंगळुरू येथील जी. ए. सॉफ्टवेअरसह तिच्या संचालकांना अखेर महाराष्ट्र शासनाने कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकले आहे. तसा शासन आदेश महाराष्ट्र शासनाने पारीत केला आहे.
म्हाडा प्राधिकरणाच्या आस्थापनेवरी गट अ ते गट ड संवर्गातील पदे भरण्यासाठी बाह्य एजन्सीची निवड करण्याचे ठरले होते. त्यानुसार परिक्षा घेणार्या संस्थांची निवड करण्यात येणार होती. त्या प्रक्रीयेद्वारे चार परिक्षा घेणार्या कंपन्यांनी निविदा प्रक्रीयेत भाग घेतला होता. त्यामध्ये मेसर्स अॅपटेक लिमिटेड, जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, जींजर वेब्ज प्रायव्हेट लिमिटेड तसेच मेटा आय टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश होता. त्यातून जी. ए. सॉफ्टवेअरची नेमणूक करण्यात आली होती. परंतु, म्हाडाचा पेपरफुटी प्रकरणात जी. ए. सॉफ्टवेअरच्या संचालकाला अटक करण्यात आली. निष्काळजीपणा, गोपनीयतेचा केलेला भंग, अनैतिक व बेकायदेशिर कृत्यामुळे जी. ए. सॉफ्टवेअरला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.
जी. ए. सॉफ्टेवअरला बर्याच परिक्षांचे कंत्राट देण्यात आले होते. त्यामध्ये टीईटीची परिक्षा घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. परंतु, परिक्षार्थीकडून पैसे घेऊन त्यांचे गुण वाढवून त्यांना पास केल्याचे धक्कादायक प्रकार आत्तापर्यंत उघडकीस आले आहेत. अशा पध्दतीने सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांना विविध पध्दतीने पास केले आहे. त्यात जी. ए. सॉफ्टवेअरच्या संचालकांचा देखील सहभाग आढळून आल्याने संचालक डॉ. प्रितेश देशमुख याला अटक करण्यात आली आहे.