पुण्यात सलग चौथ्या दिवशी पाऊस; दिवसभर रिमझिम

पुण्यात सलग चौथ्या दिवशी पाऊस; दिवसभर रिमझिम

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात सलग चौथ्या दिवशी मानसूनने हजेरी लावत भिज पाऊस दिला. दिवसभर उघडीप होती. मात्र, सायंकाळी पाचनंतर पावसाला सुरुवात झाली. शहरातील सर्वच भागांत एकसारख्या वेगाने पाऊस रात्री उशिरापर्यंत पडत होता. सायंकाळी 6 पर्यंत शहरात 4 मिमी, तर पाच दिवसांत 63 मिमी पावसाची नोंद झाली.

गुरुवारीही दिवसभर रिमझिम पाऊस होता. मात्र, सायंकाळी सहानंतर भिज पावसाला सुरुवात झाली. तो रात्री उशिरापर्यंत सुरु होता. घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्याने त्याचा परिणाम शहरावर होत असून, शुक्रवारी पहाटेच पावसाला सुरुवात झाली. मात्र, सकाळी 7 वाजता पाऊस थांबला, नंतर दिवसभर उघडीप होती. सायंकाळी 5 वाजता भिज पाऊस सुरु झाला. शिवाजीनगर, कर्वे रोड, कोथरूड, रेल्वे स्थानक, स्वारगेट परिसर या भागात रस्त्यावर तळी साचली. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवणे अवघड जात होते.

शहरात 4 जुलैपर्यंत पाऊस

घाटमाथ्याला 1 ते 4 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने शहरातील पाऊस वाढला आहे. घाटमाथ्यावर मुसळधार तर शहरात भिज पाऊस राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे.

पाच दिवसांत 63 मिमी पावसाची नोंद

शहरात 24 जूनपासून पावसाला सुरुवात झाली. तोपर्यंत केवळ 20.4 मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र, त्यानंतर सलग चार ते पाच दिवसांपासून शहरात भिज पाऊस सुरू झाला. या पाच दिवसांत शहरात 63 मिमी पावसाची भर पडली. त्यामुळे शहरात 30 जूनपर्यंत एकूण 83.9 मिमी इतका पाऊस झाला. शहराची जूनची सरासरी 152.9 मिमी पावसाची आहे. 30 जूनअखेर 69 मिमी यंदा तूट राहिली आहे.

शुक्रवारी सायंकाळी 6 पर्यंत झालेला पाऊस (मिमी)

शिवाजीनगर
– 2.5
पाषाणः 4.3
लोहगाव ः 2.2
चिंचवडः 5
लवळेः 0.5

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news