कर्नाटकात आजपासून अन्नभाग्य, धनभाग्य! ४.४२ कोटी लाभार्थ्यांना मिळणार लाभ | पुढारी

कर्नाटकात आजपासून अन्नभाग्य, धनभाग्य! ४.४२ कोटी लाभार्थ्यांना मिळणार लाभ

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : निवडणूक काळात सरकारने दिलेल्या आश्वासनाची 1 जुलैपासून पूर्तता करण्यात येणार आहे. अन्नभाग्य योजना राज्यातील जनतेसाठी लागू होणार असून, याचा लाभ 4.42 कोटी लाभार्थ्यांना होणार आहे. यातून 5 किलो तांदूळ आणि 5 किलो तांदळाची रक्कम देण्यात येणार आहे. राज्यातील जनतेला अन्नभाग्यबरोबरच धनभाग्यही लाभणार आहे.

राज्य सरकारने 1 जुलैपासून अन्नभाग्य योजना जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून 10 किलो तांदूळ देण्यात येणार होते; परंतु तांदळाची कमतरता असल्याने सरकारकडून निम्मे तांदूळ आणि निम्मी रक्कम देण्यात येणार आहे. राज्यातील 1.17 कोटी दारिद्य्र रेषेखालील (बीपीएल) तर 10.90 लाख अंत्योदय शिधापत्रिकाधारकांचा योजनेचा लाभ मिळणार आहे.

पत्रकारांबरोबर बोलताना ते म्हणाले, राज्य सरकारकडे यासाठी आवश्यक निधी आहे. त्याचबरोबर लाभार्थ्यांच्या बँक खात्याचीही माहिती उपलब्ध आहे.  दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत आहोत. केंद्राकडे तांदळाची मागणी केली होती. यासाठी महिनाभर प्रयत्न करण्यात आले. परंतु केंद्राने तांदूळ देण्यास नकार दिला. यामुळे 5 किलो तांदळाची रक्कम देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 10 किलो तांदूळ देण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार आगामी काळात दक्षिण कर्नाटकात 2 किलो नाचणी, 8 किलो तांदूळ , उत्तर कर्नाटकात 2 किलो जोंधळा, 8 किलो तांदूळ देण्यात येईल.

प्रतिकिलो 34 रुपये

सरकारकडे अतिरिक्त तांदूळ उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच किलो तांदळाची रक्कम प्रतिकिलो 34 रुपयाने देण्यात येणार आहे. एका व्यक्तीला यातून 170 रु. देण्यात येणार असून, ही रक्कम थेट बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी दिली.

Back to top button