

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलांकडून सोन्या तापकीर या तरुणाचा खून घडवून आणणारा मास्टरमाइंड करण रोकडे याच्यासह चौघांना भारत-नेपाळ बॉर्डरजवळ पोलिसांनी अटक केली. गुंडाविरोधी पथकाने ही कामगिरी केली. करण रतन रोकडे (वय 25), ऋत्विक ऊर्फ मुंग्या रतन रोकडे, रिंकू दिनेश कुमार, (वय 19) आणि अल्पवयीन मुलगा (सर्व रा. चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 मे रोजी आरोपींनी वर्चस्ववादातून सोन्या तापकीर याचा चिखली ठाण्याच्या हद्दीत गोळ्या घालून खून केला.
त्यानंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपी लोणावळा, गोवा, मध्य प्रदेश, गुजरात व उत्तर प्रदेश या राज्यामध्ये राहण्याची ठिकाणे वेळोवेळी बदलत होते. दरम्यान, गुंडाविरोधी पथकातील मयूर दळवी, सुनील चौधरी व विजय तेलेवार यांच्या पथकाला आरोपींबाबत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस अंमलदार शाम बाबा यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी करण रोकडे हा उत्तर प्रदेशातील मथुरा येथे असल्याची माहिती प्राप्त झाली.
त्यानुसार, गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिश माने व कर्मचारी मथुरा, उत्तर प्रदेश येथे गेले. त्या वेळी मुख्य आरोपी करण रोकडे हा मथुरेपासून सुमारे 750 किलोमीटर लांब अंतरावर भारत नेपाळ बॉर्डरजवळील मधुवन येथे असल्याचे कळाले. तो नेपाळ येथे पळून जाण्याच्या तयारीत होता. गुंडाविरोधी पथकाने तेथे जाऊन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांची चाहूल लागताच चारही आरोपींनी पहिल्या मजल्यावरून उडी मारून शेतामध्ये पळून गेले. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून अटक केली. आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सहायक निरीक्षक हरिश माने, सागर पानमंद, अंमलदार हजरत पठाण, प्रवीण तापकीर, सोपान ठोकळ, गंगाराम चव्हाण, विक्रम जगदाळे, गणेश मेदगे, विजय गंभिरे, सुनील चौधरी, नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, मयूर दळवी, रामदास मोहिते, शुभम कदम, ज्ञानेश्वर गिरी, तौसीफ शेख, नागेश माळी, पोपट हुलगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
आरोपी करण रोकडे याने गुन्ह्यात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन आरोपींना पिस्तूल मिळवून दिले. यातील धक्कादायक बाब म्हणजे शहरातील निर्जन ठिकाणी नेऊन आरोपीने अल्पवयीन मुलांना पिस्तूल चालवण्याचे प्रशिक्षणदेखील दिले. त्यानंतर घटनेच्या दिवशी आरोपी रोकडे हा जाणीवपूर्वक गोवा येथे निघून गेला. पोलिस लोकेशन काढतील म्हणून त्याने आपला मोबाईलही घरात ठेवला होता. मात्र, तरीदेखील पोलिसांनी आरोपीचा प्लॅनच्या चिंध्या करून त्याच्या मुसक्या आवळल्या.
हेही वाचा