

सांगली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीतील फुटीचे पडसाद जिल्ह्यात दुसर्या दिवशीही उमटत आहेत. भाजप नेते, पदाधिकारी यांनी अजित पवार व त्यांच्या सहकार्यांचे स्वागत केले. उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटातील कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत. तसेच अजितदादा गटातील आमदारांना मंत्रीपद द्यावे लागणार असल्याने सरकारमध्ये सहभागी असलेल्या जिल्ह्यातील काही आमदारांचे मंत्रीपद हुकणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भाजप नेत्यांकडून स्वागत
भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले, बेरजेचे राजकारण करण्यात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे कोणीच नाही. अजित पवार यांनी पाठिंबा दिल्याने सरकार तसेच पक्षही अधिक बळकट झाला.
सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व झाले आहे. अजित पवार यांचे स्वागतच आहे. राष्ट्रवादीसोबत आल्याने नक्कीच बळ मिळेल.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, अजित पवारांचा हा धाडसी व धडाडीचा निर्णय आहे. त्यांच्या रुपाने महाराष्ट्राला कार्यक्षम उपमुख्यमंत्री मिळाला आहे.
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर म्हणाले, या घटनेने शिंदे- फडणवीस सरकार राज्यामध्ये करत असलेल्या विकासावर शिक्कामोर्तब झाले. याचा येणार्या काळात राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच उपयोग होईल.
या राजकीय उलथापालथीमुळे शिंदे तसेच ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमात आहेत. अनेकांना राजकीय हालचालीचा अंदाज येईना झाला आहे. त्यामुळे काहीजण व्यक्त होताना सावधगिरी बागळत आहेत.
याबरोबर गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील भाजप व शिंदे गटाच्या काही आमदारांची मंत्री पदी वर्णी लागण्याची चर्चा होती. आता त्यांचा पत्ता कट होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
भाजपला जनताच धडा शिकवेल : पाटील
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अभिजित पाटील म्हणाले, भाजपकडे निवडणुकीला सामोरे जाण्याची हिम्मत नाही, त्यामुळे ते इतरांचे पक्ष फोडत आहेत. कालपर्यंत ज्यांच्यावर भाजपवाले भ्रष्टाचाराचे आरोप करीत होते त्यांनाच पायघड्या घालून बोलावले आहे. या पक्षफोडीचा शिवसेनेवर काही परिणाम होणार नाही. ठाकरे शिवसेनेची ताकत वाढत आहे. भाजपची ही कुटील नीती महाराष्ट्रातील सूज्ञ जनता पहात आहे. आगामी निवडणुकीत जनताच त्यांना धडा शिकवेल.
सोशल मीडियावर संताप अन् गंमतीही
राज्यातील राजकीय घडामोडीवर सोशल मीडियात प्रतिक्रियांचा पाऊस आहे. अनेकजण गंमतीदार मिम्मस् व्हायरल करीत आहेत. काहीजण गंभीरपणे व्यक्त होऊन राजकारणावर बोचरी टीका करीत आहेत. बहुतांश सामान्य जनतेतून संताप व्यक्त होत आहेे. सत्तेसाठी नेते काहीही करतील, अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया उमटत आहे.