मोहोळ राष्ट्रवादी अजित पवारांच्या पाठीशी | पुढारी

मोहोळ राष्ट्रवादी अजित पवारांच्या पाठीशी

रमेश दास

मोहोळ :  रविवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर मोहोळ तालुक्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. माजी आमदार राजन पाटील, विद्यमान आमदार यशवंत माने, राष्ट्रवादीचे राज्य प्रवक्ते उमेश पाटील, जि.प.चे माजी उपाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी अजित पवार यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे.

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रपदाची शपथ घेताच मोहोळ शहरात, मतदारसंघात गुलालाची उधळण, तर काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी केली. सत्ता संघर्षातील घडामोडींमुळे मोहोळ तालुक्यातील भाजपची ताकद आणखी भकक्कम झाल्याचे दिसत आहे. या भूकंपामुळे मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असली तरी मोहोळ तालुक्यातील मतदार माजी आमदार पाटील व आमदार माने यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. याची प्रचिती वेळोवेळी झालेल्या लोकसभा व विधानसभेच्या निकालावरुन दिसून येते. त्यामुळे ‘जिकडे राजन पाटील तिकडे मोहोळची जनता’, असे समिकरण झाले आहे. अजित पवार यांनी राज्यातील सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सोबत राष्ट्रवादीचे बहुतेक बडे नेते होते. पक्षातील या फुटीमुळे स्थानिक पातळीवर शरद पवार यांच्या निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता, तर अजित पवार समर्थकांत जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहे.

जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते अजित पवार यांच्या निर्णयाबरोबर आहोत, असे उमेश पाटील यांनी सांगितले आहे. विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असणे गरजेचे होते. त्यासाठी अजित पवार यांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयात आम्ही सहभागी आहोत, असे विक्रांत पाटील यांनी स्पष्ट केले. अजित पवारांच्या या निर्णयामुळे तालुक्यात व जिल्ह्यात भाजपची ताकद वाढेल, असे भाजप नेते संजय क्षीरसागर यांनी सांगितले. याचा शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख अशोक भोसले यांनी सांगितले.

Back to top button