सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचा नव्हे, आता भाजपचा बालेकिल्ला

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचा नव्हे, आता भाजपचा बालेकिल्ला
Published on
Updated on

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजप सोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सोलापूर शहरात शरद पवार व अजित पवार यांना मानणारा, असे दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ही ओळख पुसून आता भाजपचा बालेकिल्ला, अशी झाली आहे. या बंडामुळे शहरातील अजितदादांच्या समर्थकांना मोठे पाठबळ मिळणार आहे. राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने आता शहरात भाजपचा आणखी दबदबा वाढणार आहे.

अजितदादा यांच्या समर्थकांकडून पवारांच्या निर्णयाला पाठिंबा देत मिठाई वाटून, फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. शरद पवार आमचे दैवत, पण आम्ही अजितदादा सोबत असल्याचे सांगण्यात आले. शरद पवार यांना मानणार्‍या गटाची पहिल्या दिवशी सावध भूमिका राहिली. त्यानंतर सोमवारी राष्ट्रवादी कार्यालयात झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाठीशी ठाम राहण्यावर एकमत झाले. कालपर्यंत अजितदादा आमचे नेते होते; मात्र आता अजितदादा आमचे नेते नसून आमचे नेते शरद पवारच आहेत असे म्हणत महिला आघाडी व युवकांनी कार्यालयातील अजित पवार यांचा फोटोही काढला आहे. अजित पवारांनी बंड केल्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. सध्या तरी जिल्ह्यातील दोन आमदारांनी अजित पवार यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात विशेषता युवकवर्गात अजित पवारांची मोठी क्रेझ आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव संतोष पवार, शहर युवक अध्यक्ष जुबेर बागवान हे कट्टर अजित पवार समर्थक आहेत. येणार्‍याकाळात त्यांना शहरात मोठी पदे मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शरद पवार गटामधून इतरही नाराज गट अजितदादा यांच्या गटात येण्याची शक्यता आहे. महिला आघाडी, अल्पसंख्याक, शरद पवारांसोबत राहण्याची शक्यता आहे. एकंदरीत राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शिवसेनेसारखी दोन गटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा शहरातील राजकारणावर फारसा काही परिणाम होणार नाही. मात्र ग्रामीणबरोबर शहरातही भाजप आणखीन भक्कम होणार, हे मात्र निश्चित.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या भूकंपानंतर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघणार आहे. प्रत्येक तालुक्याच्या स्थानिक राजकारणावर त्याचा परिणाम होणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. काहीही झाले तरी या घटनेमुळे जिल्ह्यात भाजपच मजबूत होईल हे नाकारून चालणार नाही. त्यादृष्टीने आश्वासक तयारी भाजपच्या वरिष्ठांनी केल्याचे या सगळ्या घटना-घडामोडींवरुन स्पष्ट होते.

यांची झाली अडचण

काँग्रेस, शिवसेना असे करत राष्ट्रवादीमध्ये आलेले महेश कोठे हेही अडचणीत आले आहेत. अद्याप कोठे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला नसला तरी ते राष्ट्रवादीत सक्रिय आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर कोठेंनीही 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. ते पुन्हा काँग्रेस किंवा शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे एमआयएममधून नाराज होऊन आलेले तौफिक शेख हेही पेचात पडले आहेत. एमआयएम किंवा काँग्रेसमध्ये घर वापसी करणार असल्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेस सोडून आलेले सुधीर खरटमल, यू. एन. बेरिया यांनी जरी राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश केला नसला तरी पक्ष वाढवण्यासाठी ते सक्रिय होते. खरटमल यांनी तर शहराध्यक्ष पदासाठी व लोकसभा लढण्याची तयारी केली होती. मात्र राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आयाराम-गयारामांची मोठी अडचण झाली आहे.

पारंपरिक अजितदादा गट जाहीरपणे मैदानात

सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दादा आणि साहेब समर्थकांचा गट यापूर्वीच होता. अजित पवार हे बंडाचे निशाण फडकावत भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर पारंपरिक अजितदादा गट जाहीरपणे पुढे आला. यामध्ये संतोष पवार, जुबेर बागवान, आनंद मुस्तारे, महेश निकंबे, रमजान कारभारी, बसू कोळी, सोमनाथ शिंदे, सरफराज बागवान, मोहसीन मुजावर, प्रमोद भोसले आदी तरुण कार्यकर्त्यांची फळी आहे.

बालेकिल्ल्याची ओळख पुसली

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अपक्षासह तीन आमदार अजित पवारांच्या मागे आहेत. त्यामुळे भाजपकडे आता भाजप व समर्थक असे 6, शिंदे सेना एक आणि राष्ट्रवादीतून फुटलेले दोन व एक अपक्ष, असे दहा आमदारांचे बळ आले आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला सोलापूर जिल्हा आता फुटीमुळे भाजपचा बालेकिल्ला झाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

हे कट्टर शरद पवार समर्थक

सोलापूर शहरामध्ये शहराध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर जनार्दन कारमपुरी, माजी महापौर मनोहर सपाटे, शंकर पाटील, महेश गादेकर यांच्यासह ज्येष्ठमंडळी हे कट्टर शरद पवार समर्थक मानले जातात. त्यामुळे अजित पवार यांना ते विरोध करतील, असे सांगितले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news