पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) संचलन तुटीमध्ये दरवर्षी वाढच होत असल्याने उत्पन्नवाढीसह विविध पर्यायांचा विचार करावा, यासाठी मार्केटिंग विभाग सुरू करावा, अशा सूचना महापालिकेने पीएमपीएमएल प्रशासनाला केल्या आहेत.
पीएमपीएमएल प्रशासनाकडून प्रवासीसंख्या वाढविण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. प्रवाशांना वेळेत बस मिळाव्यात, यासाठी मार्गावर अधिक बस आणल्या जात आहेत. त्यामुळे पीएमपीएमएल बसची प्रवासीसंख्या वाढू लागली आहे. असे असले तरी दुसरीकडे तोटाही वाढत आहे. पीएमपीएमएलची संचलन तूट 2017 साली 250 कोटी रुपये होती. त्यात वाढ होऊन ती आता पाच वर्षांत 750 कोटींवर गेली आहे.
पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रशासनाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यासाठी काय करता येईल, खर्च आणि मिळणार्या उत्पन्नाचा मेळ कसा घालावा, यावर चर्चा झाली. त्या वेळी पीएमपीएमएलच्या काही मालमत्ता पीपीपी तत्त्वावर विकसित केल्या जातील. तसेच प्रवासीसंख्या वाढवायची असेल, तर मार्केटिंग विभाग असावा, असा विचार मांडला असल्याचे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
पीएमपीएमएलने भाड्याने घेतलेल्या 200 बस, सीएनजी, डिझेलचे वाढलेले दर, कामगारांचे वाढलेले पगार याससह पीएमपीचे दरवर्षी 400 कर्मचारी निवृत्त होतात. त्यामुळे त्यांना द्यावे लागणारे लाभ यामुळे मोठा खर्च वाढला आहे. त्यामुळे तूट वाढते. तसेच प्रवासीसंख्या वाढूनदेखील उत्पन्नात हव्या तेवढ्या प्रमाणात वाढ झालेली नाही. गेल्या वर्षी 11 लाख प्रवाशांनी प्रवास केला, तर या वर्षी 12 लाख 80 हजार प्रवास केला. म्हणजेच पीएमपी बसचे 1 लाख 60 प्रवासी वाढले आहेत. मेट्रोमुळे पीएमपीएमएलचे प्रवासी कमी होतील, असे बोलले जात होते. मात्र, मेट्रोमुळे प्रवासीसंख्या वाढली आहे, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
डेक्कन बसस्थानकाचा अन्य व्यावसायिक वापर होऊ शकतो. पीएमपीएमएलच्या मालमत्ता पीपीपी तत्त्वावर विकसित केल्या जातील. त्यातून पीएमपीला आर्थिक उत्पन्न मिळण्यास मोठा हातभार लागेल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या भागात दोन ठिकाणी असा पर्याय वापरण्याची सूचना केल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले.
हेही वाचा