Pune Ganeshotsav 2023 : पुणेकरांचा लाडक्या बाप्पांसाठी ‘होऊ दे खर्च’! तब्बल दीड हजार कोटींची उलाढाल

Pune Ganeshotsav 2023 : पुणेकरांचा लाडक्या बाप्पांसाठी ‘होऊ दे खर्च’! तब्बल दीड हजार कोटींची उलाढाल

पुणे : गणरायाला 'विघ्नहर्ता' म्हटले जाते ते अगदी अचूक म्हटले पाहिजे. आता पाहा ना, पुण्यातील सरत आलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने तब्बल दीड हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली अन् अर्थव्यवस्थेमध्ये चैतन्य आले. लाडक्या गणरायाच्या आगमनानंतर त्याच्या पाहुणचारात पुणेकरांनी कोणतीच कसर ठेवली नसल्याचे बाजारातील कोट्यवधींच्या उलाढालीवरून स्पष्ट होते. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात पूजेच्या साहित्यापासून गणेशमूर्ती, सजावट, फुले, दागिने व मिठाईसाठी, तसेच इतर खरेदीसाठी भाविकांनी गेल्या दहा दिवसांत मुक्तहस्ते खर्च करत गणरायाचे मनोभावे पूजन केल्याचे दिसून येते.

कोरोनाचे सावट सरल्यानंतर यंदा घरगुतीसह सार्वजनिक स्वरूपात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. सार्वजनिक तसेच घरोघरी लाडक्या गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर फुले, नारळ, फळे, मिठाई, विद्युत माळा, सराफा व्यावसायिक, मंडप व्यावसायिक, देखावे तयार करणारे सजावट कारागिरांसह हारविक्रेते सज्ज झाले होते. गणरायाच्या प्रतिष्ठापनेपासून उत्सव निर्विघ्न पार पडत आहे. या काळात मोठी उलाढाल होऊन व्यावसायिकांपासून किरकोळ विक्रेते, कारागीर यांना विघ्नहत्र्याने 'अच्छे दिन' दाखवून दिले.

जाहिरात ठरले सर्वाधिक उत्पन्नाचे साधन

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायचा म्हटलं तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तजवीज करावी लागते. मध्यवर्ती भागातील मंडळांना गतवर्षीप्रमाणे यंदा जाहिरातदारांनी मोठा आधार दिला. त्यामुळे, नेहमीप्रमाणे काढणार्‍या वर्गणीसह जाहिरातस्वरूपात मिळणार्‍या उत्पन्नामुळे मंडळाची गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा यंदा भव्यदिव्य झाली. दरवर्षी जमा होणार्‍या एकूण वर्गणीच्या तुलनेत जाहिरातदारांचा वाटा तब्बल सत्तर ते ऐंशी टक्के एवढा राहिला. त्यामुळे, मंडळांनीही गणरायाच्या आगमनापासून दहा दिवसांचा उत्सव मोठ्या थाटमाट दिसून आला. मात्र, मध्यवर्ती भाग वगळता अन्य भागात मंडळांची वर्गणीदारावरच भिस्त राहिली.

उकडीसह माव्याच्या विविध फ्लेवर्सचे लाखो मोदक फस्त

घरगुती, बचत गट तसेच मिठाई विक्रेत्यांकडून उकडीच्या मोदकांची आगाऊ नोंदणी करत विक्री करण्यात येत होती. तर, माव्याच्या मोदकासह चॉकलेट, पान, रसमलाई, केशर-मावा, ओरिओ, रोझ-गुलकंद, ड्रायफ्रूट, अंजीर, श्रींखड यांसारखे विविध फ्लेवर्सच्या मोदकांनाही मिठाई विक्रेत्यांकडे मोठी मागणी राहिली. बाजारात एका उकडीच्या मोदकाची 30 ते 50 रुपये, तर अन्य मोदकांची 750 ते 1 हजार रुपये किलो दराने विक्री सुरू होती. यंदा गौराई पूजनावेळी लागणार्‍या फराळाच्या मागणीतही वाढ झाल्याचे सांगण्यात आले. गौराईच्या अनुषंगाने बाजारात लाडू नग, तर चिवडा, शेवई, शंकरपाळी आदी साहित्य पावशेरच्या पाकिटांमध्ये उपलब्ध झाले होते. गणेशोत्सवात लाखो मोदक व हजारो किलो फराळाच्या साहित्यांची विक्री होऊन कोट्यवधींची उलाढाल झाली.

मंडप, सजावटीसाठी लाखोंचा खर्च

मंडळाच्या मंडपासाठी लहान मंडळांनी 25 हजार ते 1 लाख रुपये तर मोठ्या मंडळांनी 1 लाख रुपयांपासून ते दहा लाख रुपयांपर्यंत खर्च केला. यामध्ये, सजावटीनुसार खर्चामध्ये वाढ घटही झाली. भाडेतत्त्वानुसार घेतलेल्या देखाव्यासाठी कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त दहा हजार रुपये मंडळांनी खर्च केले. याखेरीज, विद्युतरोषणाई, कारंजे आदींसाठी एक लाख रुपयांपासून दहा लाख रुपयांपर्यंत सरासरी खर्च आल्याचे मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. तर, जिवंत देखाव्यांसाठी मंडळांनी सात दिवसांसाठी अडीच ते तीन लाख रुपये मोजले.

विद्युत माळा, दिव्यांची आकर्षक रोषणाई

गणेशोत्सवात विद्युतरोषणाई हा सजावटीचा अविभाज्य भाग असल्याने लाइटिंगच्या माळांना मोठी मागणी असते. शहरातील बाजारपेठेत स्वदेशी एलईडी माळांसह चायनामेड लाइटला मोठी मागणी राहिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध प्रकारचे आकर्षक दिवे तसेच विद्युत माळा बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या. गतवर्षीपेक्षा यंदा या बाजारपेठा उजळून निघाल्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात करण्याचा चंग बांधल्याने सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात आकर्षक रंगसंगती असलेल्या दिवे, माळांची खरेदी केली. गणरायाच्या आगमनाच्या महिनाभर आधीपासून गौराई आवाहनापर्यंत बाजार गजबजून गेला होता. परिणामी, गतवर्षीच्या तुलनेत यंदाइलेक्ट्रिक वस्तूंच्या मार्केटमध्येही मोठ्या प्रमाणात उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.

ढोलपथके, डीजे बुकिंग फुल्ल

शहरातील प्रमुख मंडळांनी ढोल-ताशा पथके नेहमीप्रमाणे बुक केली होती. निर्बंधमुक्त गणेशोत्सवाची घोषणा झाल्यानंतर मंडळांकडून ढोल-पथकांसह डीजेंची विचारणा होऊ लागली. गणरायाच्या प्राणप्रतिष्ठापनेसह विसर्जनासाठी वादकांच्या संख्येनुसार ढोल पथकांकडून, तर आवाजानुसार डीजेवाल्यांकडून पैशांची मागणी होऊ लागली. ढोल पथकासाठी सरासरी 40 हजार तर डीजेसाठी 1 लाख रुपये मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोजल्याचे सांगितले.

खाद्यपदार्थांच्या विक्रीत 20 ते 30 टक्क्यांनी वाढ

गणेशोत्सव काळात मध्यवर्ती भागासह उपनगरांतील खाद्यपदार्थांच्या विक्रीत वीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली. दरवर्षीप्रमाणे सारसबाग, शनिवारवाडा चौपाटी, वृध्देश्वर-सिध्देश्वर चौपाटी, डेक्कन चौपाटी आदी ठिकाणांसह हॉटेलचालकांच्या खाद्यविक्रीत वीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली. भेळ, आईस्क्रीम, पाणीपुरी, चाट, डोसा, कॉर्न, पॉप कॉर्न, गोबी मंच्युरियन, शाकाहारी व मांसाहारी बिर्याणी, रोल अशा पदार्थांना मोठी मागणी राहिली. शहरातील शाकाहारी व मांसाहारी हॉटेलमध्ये खवय्यांची संख्याही या काळात वाढल्याचे दिसले नेहमीपेक्षा 20 ते 30 टक्के जास्त ग्राहक वाढले आहेत. तसेच खेळण्याची दुकाने, इमिटेशन ज्वेलरी विक्रेत्यांचा व्यवसायही चांगला होऊन हॉटेलचालकांसह अन्य साहित्य विक्रेत्यांचीही उलाढाल चांगली होती.

विद्युत माळा, दिव्यांची आकर्षक रोषणाई

गणेशोत्सवात विद्युतरोषणाई हा सजावटीचा अविभाज्य भाग असल्याने लाइटिंगच्या माळांना मोठी मागणी असते. शहरातील बाजारपेठेत स्वदेशी एलईडी माळांसह चायनामेड लाइटला मोठी मागणी राहिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध प्रकारचे आकर्षक दिवे तसेच विद्युत माळा बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या. गतवर्षीपेक्षा यंदा या बाजारपेठा उजळून निघाल्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात करण्याचा चंग बांधल्याने सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात आकर्षक रंगसंगती असलेल्या दिवे, माळांची खरेदी केली. गणरायाच्या आगमनाच्या महिनाभर आधीपासून गौराई आवाहनापर्यंत बाजार गजबजून गेला होता. परिणामी, गतवर्षीच्या तुलनेत यंदाइलेक्ट्रिक वस्तूंच्या मार्केटमध्येही मोठ्या प्रमाणात उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.

ढोलपथके, डीजे बुकिंग फुल्ल

शहरातील प्रमुख मंडळांनी ढोल-ताशा पथके नेहमीप्रमाणे बुक केली होती. निर्बंधमुक्त गणेशोत्सवाची घोषणा झाल्यानंतर मंडळांकडून ढोल-पथकांसह डीजेंची विचारणा होऊ लागली. गणरायाच्या प्राणप्रतिष्ठापनेसह विसर्जनासाठी वादकांच्या संख्येनुसार ढोल पथकांकडून, तर आवाजानुसार डीजेवाल्यांकडून पैशांची मागणी होऊ लागली. ढोल पथकासाठी सरासरी 40 हजार तर डीजेसाठी 1 लाख रुपये मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोजल्याचे सांगितले.

सत्तर टक्के पीओपी, तर उर्वरित शाडू मातीच्या मूर्ती

गणेशमूर्ती रंगकामासाठी कमी वेळ मिळाल्याने यंदा नेहमीच्या तुलनेत तीस टक्क्यांनी उत्पादन कमी झाल्याचे मूर्तिकारांकडून सांगण्यात आले. त्यामुळे, यंदा पीओपीच्या मूर्तींच्या दरातही दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली होती. शाडू व अन्य मूर्तींचे प्रमाण यंदा नेहमीसारखेच राहिले. त्यामध्ये विशेष काही फरक जाणवला नाही. लहानतल्या लहान गणेशमूर्तीची पाचशे रुपयांपासून पंचवीस हजारांपर्यंत मूर्तींची विक्री झाली. काही मूर्ती त्यापेक्षा जास्त किमतीत विकल्या गेल्या. यामार्फत बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे जाणकारांनी सांगितले.

शहरात विराजमान झालेल्या गणेशमूर्ती

घरगुती …………… सात लाख
सार्वजनिक …………. दहा हजार
पीओपी मूर्ती…………. सहा लाखांहून अधिक
शाडू मूर्ती…………. सत्तर ते ऐंशी हजारांहून अधिक

दररोज तीन लाखांहून अधिक नारळ

गणेशोत्सवात पूजेसह मोदकासाठी नारळाला मोठी मागणी राहिली. शहरातील गुलटेकडी मार्केटयार्डातील बाजारात दररोज तीन ते चार हजार पोत्यांमधून जवळपास तीन लाखांहून अधिक नारळांची आवक झाली. धार्मिक विधी, तोरण यासाठी तामिळनाडूच्या वाणी अंबाडी भागातून येणार्‍या नव्या नारळास, तर मोदकांसाठी साफसोल व मद्रास नारळास चांगली मागणी आहे. याखेरीज, जिल्ह्याच्या विविध भागांतील धार्मिक स्थळांवरूनही नारळांना चांगली मागणी राहिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर किरकोळ बाजारात 20 रुपयांपासून 40 रुपयांपर्यंत नारळाची विक्री झाली.

नारळ शेकडा दर

मद्रास : 2 हजार 350 ते 2 हजार 500
पालकोल : 1 हजार 325 ते 1 हजार 450
नवा नारळ : 1 हजार 300 ते 1 हजार 450
साफसोल : 1 हजार 700 ते 2 हजार 400

येथून झाली आवक

शहरात तामिळनाडूतून नवा नारळाची आवक झाली. याखेरीज, आंध— प्रदेश येथून पालकोल, तर कर्नाटकातून साफसोल व मद्रास नारळाची बाजारात आवक झाली.

फुलबाजारात दहा कोटींहून अधिक रुपयांचे व्यवहार

गणरायाच्या दैनंदिन पूजेवेळी लागणार्‍या हारासाठी झेंडू, गुलछडी, शेवंती, गुडछडी आणि डच गुलाबाच्या फुलांना शहरातील हार विक्रेत्यांकडून मोठी मागणी राहिली. गेल्या काही वर्षांत डच गुलाबाच्या पाकळ्यांच्या हाराला नागरिकांची मिळत असलेली पसंती यंदाही कायम राहिली. घरगुती गणपतीसाठी झेंडू, शेवंती, तगर तर मंडळांच्या गणपतीसाठी गुलछडी तसेच डच गुलाबाच्या पाकळ्यांच्या हाराला मोठी मागणी होती. यंदा हारामध्ये कापडी फुले, मोती, मणी यांचाही वापर केल्याचे दिसून आले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजारात सर्व प्रकारच्या फुलांची आवक वाढली होती. या काळात देखावे पाहण्यासाठी बाहेर पडणार्‍या महिला वर्गाकडून गजर्‍याला मागणी वाढल्याने गजर्‍याच्या फुलांचीही चांगली आवक झाली. जिल्ह्याच्या विविध भागातून 50 हून अधिक प्रकारांतील फुले तसेच सजावटीशी संबंधित फुले लाखो किलोंच्या स्वरूपात बाजारात येत होती. यंदा गणपती तसेच गौराई आगमनाच्या पार्श्वभूमीवर पाऊस झाल्याने ओल्या फुलांचे प्रमाण जास्त राहिले. त्याचा परिणाम बाजारातील आवक घटून दर घसरणीत झाला. मात्र, गणेशोत्सवातही या फुलांना मागणी व दर चांगले मिळाले.

जास्वंद, कमळ, शमी, दुर्वांमध्येही मोठी उलाढाल

गणेशप्रिय फळे व पाने असलेल्या कमळ, केवडा, शमी व दुर्वांना गणेशोत्सवात मोठी मागणी राहिली. याकाळात, गुलटेकडी मार्केट यार्डातील पान बाजारात एका पाटीला चारशे रुपयांपासून 1 हजार 200 रुपयापर्यंत भाव मिळाला तर, किरकोळ बाजारात दहा रुपयांना पंधरा तसेच वीस पानांची विक्री करण्यात आली. बाजारात आठवड्यातून चार दिवस एका पाटीमध्ये जवळपास 2 ते 3 हजार पाने, पुडक्यामध्ये 6 हजार तर एका डागामध्ये 12 हजार पाने बाजारात दाखल होत होती. गणरायाला अर्पण करण्यासाठी लागणार्‍या कमळ, दुर्वा, केवडा, शमीच्या पानांना गणेशभक्तांकडून मागणी राहिली. शहरातील किरकोळ बाजारात दुर्वा 25 ते 30 रुपये जुडी, शमी 20 रुपये, केवडा 50 ते 200 रुपये व कमळाच्या एका नगाची 10 ते 20 रुपयांना विक्री होऊन हजारो रुपयांची उलाढाल झाली.

मार्केट यार्डातील घाऊक फुलबाजारातील दहा दिवसांतील परिस्थिती

फुले आवक सरासरी दर (प्रतिकिलो)
झेंडू 8 लाख 79 हजार 331 15 ते 30 रुपये
शेवंती 2 लाख 99 हजार 333 50 ते 100 रुपये
गुलछडी 71 हजार 10 किलो 179 ते 301 रुपये
डच गुलाब (गड्डी) 90 हजार 728 80 ते 128 रुपये

  • दुर्वांसह मोदक, कान, हार, त्रिशूल, कमळाला मोठी पसंती
  • चांदीचा भाव 73 ते 74 हजार रुपये इतका राहिला
  • सराफा बाजारात हजारो कोटींची उलाढाल
  • चांदीसह सोन्याचे फोर्मिंग दागिने खरेदीकडे करण्याकडेही कल

गणपती, गौराईसाठी देशभरातून फळे

प्रतिष्ठापनेवेळी पूजेसाठी लागणार्‍या पाच फळांसह गौराईच्या फळावळीसाठी बाजारात संत्री, मोसंबी, चिकू, पेरू, सफरचंदांसह विविध फळांना मोठी मागणी राहिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह हिमाचल प्रदेश येथून गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात मोठ्या प्रमाणात फळांची आवक झाली होती. प्रतिष्ठापनेसह गौरीपूजन तसेच प्रसादाच्या अनुषंगाने नागरिकांकडून फळांची खरेदी करण्यात आली. या काळात हिमाचल प्रदेश येथून सफरचंदाची सर्वाधिक आवक झाली. त्यापाठोपाठ मोसंबीला सर्वाधिक मागणी राहिली. दहा दिवस चालणार्‍या उत्सवासाठी सर्वाधिक काळ टिकणार्‍या फळांना मोठी मागणी राहिली.

घाऊक फळबाजारातील उलाढाल

फळे आवक (क्विंटल) बाजारभाव (सरासरी) उलाढाल (सरासरी)
संत्री 1 हजार 759 4 हजार 500 79 लाख 15 हजार 500
मोसंबी 5 हजार 433 3 हजार 900 2 कोटी 11 लाख 88,700
चिकू 1 हजार 188 2 हजार 300 27 लाख 32 हजार 400
सफरचंद 11 हजार 791 8 हजार 9 कोटी 43 लाख 28 हजार
पेरू 2 हजार 637 2 हजार 500 65 लाख 92 हजार 500

यंदा पीव्हीसी पाईपही ठरला महत्त्वाचा घटक

घरगुती गणपतीची सजावट करताना यापूर्वी तारा तसेच काठ्या बांधून सजावटीसाठी सांगाडा तयार करण्यात येत होत्या. यंदा मात्र इन्स्टाग्राम रिल्सवर पीव्हीसी पाईपद्वारे सांगाडा तयार करण्याच्या चित्रफिती व्हायरल झाल्या त्यामुळे पहिल्यांदा गणेशोत्सवात पीव्हीसी पाईपला सर्वाधिक मागणी राहिली. परिणामी, हार्डवेअर साहित्याच्या खरेदी-विक्रीच्या दुकानातही लाखो रुपयांची उलाढाल झाली.

चांदीच्या दागिन्यांना मोठी पसंती

लाडक्या गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पूजेचे साहित्य आणि मूर्तीला चांदीचे अलंकार वाहण्याची क्रेझ कायम आहे. दरवर्षी यामध्ये वाढ होत असल्याचे शहरातील सराफा व्यावसायिकांकडे होत असलेल्या मागणीवरून स्पष्ट होते. गणेशोत्सव काळात यंदा चांदीचा किलोचा दर हा 73 हजार 74 हजार रुपये इतका राहिला. दरवर्षीप्रमाणे यंदाही कारागिरांनी आकर्षक डिझाईनमध्ये मोदक, रत्नजडित मुकुट, तोडे, जानवे, मूषक, दुर्वाहार, कडे, बाजूबंद, पानसुपारी, जास्वंदीचा हार, मोत्यांचा हार, त्रिशूळ, सोंडपट्टी, शेला, भिकबाळी, छत्री, उपरणे आदी सोन्या-चांदीमधील आभुषणे घडविली होती.

याखेरीज, बाजारात मिनार असलेली रंगबिरंगी फुले, केवड्याची फुले आणि फळांची परडी अशा चांदीच्या दागिन्यांमध्ये वेगवेगळे प्रकार उपलब्ध झाले होते. यामध्ये, चांदीच्या दुर्वांना सर्वाधिक मागणी राहिली. त्यामुळे, गणेशोत्सवात चांदीच्या विक्रीत तिप्पट ते चौपट वाढ झाली. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडूनही चांदीचे अलंकार सार्वजनिक मंडळांच्या गणपतीला अर्पण करण्याचा कल दिसून आला. याखेरीज, मंदिरांमध्येही देणग्यांच्या स्वरूपात सोन्या-चांदीची दागिने स्वीकारल्या जाऊ लागल्याने भक्तांचा मोदक, दुर्वा तसेच विविध अलंकार खरेदी करण्याकडे कल होता.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news