

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्याचा कारभार जिथून चालतो त्या मंत्रालयाच्या इमारतीत प्रवेश करण्यावर आता कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रत्येक मजल्यासाठी वेगळ्या रंगाचे मर्यादित पास यापुढे दिले जातील. शिवाय दहा हजार रुपयांपेक्षा जास्तची रोकड आणि बाहेरील खाद्यपदार्थ मंत्रालयात नेण्यास मनाई करण्यात आली आहे. (Mantralaya Mumbai)
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयात घुसून अचानक केली जाणारी आंदोलने, इमारतीवरून उडी मारण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी असे प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले आहेत. मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावर महिनाभरात पारदर्शक स्टीलची जाळी लावण्यात येईल. इमारतीच्या टेरेसवर जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या संख्येवरही मर्यादा घालण्यात आली आहे. प्रत्येक मजल्यासाठी स्वतंत्र रंगाचे पास, ज्या विभागात काम आहे त्याच मजल्यावर प्रवेश दिला जाईल, अशा उपाययोजनांचा यात समावेश आहे.
मंत्रालयाच्या गार्डन गेटजवळील मोकळ्या जागेत अद्ययावत अभ्यागत कक्ष उभारण्यात येणार असून, तेथे पास काऊंटर, बॅग तपासणी आदीची सुविधा असेल. काही वर्षांपूर्वी मंत्रालय प्रांगणात संरक्षक जाळी उभारण्यात आली. आता त्या जाळीवरच ठिय्या आंदोलनाचे प्रकार सुरू झाल्याने सरकारसमोर नवाच प्रश्न उभा राहिला. याशिवाय, शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून मंत्रालयातील वाढलेल्या गर्दीने प्रशासकीय यंत्रणांवरही ताण पडला आहे.
आमदार, खासदारांसह गावोगावच्या नेत्यांसोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत प्रवेश पासवरून सुरक्षेवरील कर्मचाऱ्यांचे खटके उडण्याचेही प्रसंग वाढले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी गृह विभागाने मंत्रालय सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. (Mantralaya Mumbai)