खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : खाजगी रुग्णालयांत रुग्णहक्क कायद्यानुसार सनद व दरपत्रक लावण्याचे आदेश आरोग्य मंत्रालयाकडून गेल्या काळात देण्यात आले आहे. मात्र, पुणे शहर व जिल्ह्यातील बहुतांश रुग्णालयांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. उपचाराचे दर न लावल्यामुळे रुग्णांची आर्थिक लूट सुरू आहे.
कोरोना संसर्गानंतर काही खासगी रुग्णालये वाढीव बिल व जादा दर आकारत असल्याचे प्रकार पुन्हा वाढले आहेत. या रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक लूट थांबण्यासाठी प्रशासनाने तातडीने खासगी रुग्णालयांना दरफलक लावण्यासाठी सक्ती करावी, रुग्ण हक्क कायद्याचे उल्लंघन करणार्या रुग्णालयांवर कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे शहर प्रवक्ते धनंजय बेनकर यांनी केली आहे.
खासगी रुग्णालयांनी रुग्ण हक्काची सनद व दरपत्रकाची माहिती दर्शनी भागात लावणे कायद्याने बंधनकारक आहे. केंद्र सरकारने सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक लूट रोखण्यासाठी वैद्यकीय आस्थापना कायद्यात 2018 पासून वेळोवेळी सुधारणा केल्या आहेत. सुधारित रुग्ण हक्क सनद कायदा लागू केला आहे. मात्र, केंद्राच्या आदेशाकडे राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
हेही वाचा