Ashadhi wari 2023 : पालखीच्या स्वागतासाठी हडपसरनगरी सज्ज | पुढारी

Ashadhi wari 2023 : पालखीच्या स्वागतासाठी हडपसरनगरी सज्ज

हडपसर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा गुरुवारी (ता. 14) हडपसर येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. पुणे शहरातील सोहळ्याचा हा अखेरचा टप्पा असल्यामुळे या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. या सोहळ्यांच्या स्वागतासाठी हडपसर परिसर सज्ज झाला असून, प्रशासनाकडून वारकर्‍यांसाठी विविध सोयी-सुविधांचे नियोजन केले जात आहे.

महापालिकेकडून हडपसर गाडीतळ, उरुळी देवाची, सासवड रोड व मांजरी फार्म या चार ठिकाणी विसावा ओट्यांची डागडुजी, रंगरंगोटी, मंडप उभारणी, रेलिंग लावणे आदी कामे करण्यात येत आहेत. तसेच आरोग्य विभागाकडून कै. आण्णासाहेब मगर, कै. सखाराम कोद्रे, कै. रोहण काळे व कै. दशरथ भानगिरे हे दवाखाने वारकर्‍यांसाठी सकाळी 9 ते 5 या वेळेत खुले राहणार आहेत.

घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून पालखी मार्ग साफसफाईसाठी एकूण 859 सेवक चोवीस तास कार्यरत करणार आहेत. कचरा संकलनासाठी 20 ते 25 घंटागाड्या कार्यरत राहणार आहेत. 229 मोबाईल शौचालय ठेवण्याचीही व्यवस्थाही करण्यात येणार आहे. 27 कचरा कंटेनर किंवा निर्माल्य कलश ठेवण्याची व्यवस्था केली आहे.

सध्या मार्गाची साफसफाई करून पावडरची फवारणी केली जात असल्याचे हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त प्रसाद काटकर यांनी सांगितले. हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे म्हणाले, ‘यंदा पालखीसाठी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

दोन्हीही पालख्यांसाठी परिसरात 2 पोलिस उपायुक्त, 6 सहायक पोलिस आयुक्त, 13 पोलिस निरीक्षक, 50 उपनिरीक्षक व सहायक निरीक्षक, 450 पोलिस कर्मचार्‍यांसह होमगार्ड, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत.’ विविध मंडळे, संस्था, संघटना व राजकीय पक्षांकडून अन्नदान, गरजेच्या वस्तूंचे वाटप, आरोग्य
सुविधा, तसेच स्वागतासाठी व्यासपीठ आणि मंडपांच्या उभारणीचे काम सुरू आहे.

पालखी सोहळ्यांच्या स्वागतासाठी घेतलेल्या नियोजन बैठकीनुसार प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. अधिकार्‍यांशी वेळोवेळी समन्वय साधून नियोजन केले जात आहे. वारकरी व भाविकांची सेवा कशी देता येईल, याकडे प्रशासनासह स्थानिक नागरिकांनीही लक्ष द्यावे.

– चेतन तुपे-पाटील, आमदार

महापालिकेकडून येथील विसावा स्थळांची डागडुजी, रंगरंगोटी, दिवाबत्ती व सुशोभीकरण करण्यात येत आहे. वारकर्‍यांसाठी स्वच्छतागृहे, पाणी, आरोग्य सुविधा, मार्गांची डागडुजी व साफसफाई करण्यात आली आहे.

-प्रसाद काटकर, सहायक आयुक्त,
हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय

हेही वाचा

चोरीच्या संशयावरून आळंदीत पारधी समाजाचे १५० लोक ताब्यात

पुणेकरांनो सावधान ! सुशोभित रस्त्यांवर थुंकताय, तर होईल कारवाई

पुण्यात वारीच्या पहिल्याच दिवशी भीषण अपघात; 6 वारकरी गंभीर जखमी

Back to top button