पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात होणार्या जी 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने रस्त्यावर व सुशोभीकरणावर थुंकणार्यांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत 400 जणांकडून पावणेदोन लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात सोमवारपासून जी-20 आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे, शिवाय सोमवारीच शहरात पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून शहरातील रस्त्यांवर आणि चौकांमध्ये रंगरंगोटी व सुशोभीकरणाची कामे केली जात आहेत.
या साठी मागील एक महिन्यापासून कर्मचारी व अधिकारी रात्रंदिवस काम करीत आहेत. मात्र, काही बेशिस्त नागरिक रंगरंगोटी व सुशोभीकरणावर पिचकार्या मारून सुशोभीकरणाचा बेरंग करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा टाकणे, लघुशंका करण्यापासून अनेक प्रकारे अस्वच्छता पसरवीत आहेत, अशा बेजबाबदार नागरिकांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाली.
यात 6 ते 9 जून दरम्यान सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्या 71 जणांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून 46 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर याच कालावधीमध्ये 329 जणांनी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केली, त्यामुळे त्यांच्याकडून एक लाख 16 हजार रुपये महापालिकेने दंड घेतला आहे. दोन्हींमध्ये सुमारे एक लाख 62 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.