पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात जून व ऑगस्ट हे दोन महिने पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. मात्र, ते कोरडेच गेले. त्यामुळे जिल्हा प्रशासन दुष्काळ परिस्थिती हाताळताना प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. अजून काही दिवस पावसाळा शिल्लक असून, या काळात पडणार्या पावसाचा थेंब-थेंब साठविण्यासाठी आता जिल्ह्यातील सुमारे सव्वाचार हजार विहिरींचे पुनर्भरण करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
जुलैमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर ऑगस्टमध्ये पावसाने मोठी ओढ दिली. पूर्वेकडील तसेच डोंगराळ भागातील तालुक्यांत पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. महिनाभरात ही स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील 39 गावांत 35 टँकर सुरू आहेत. उशिराने दाखल झालेल्या मान्सूनमुळे जिल्ह्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुढाकार घेत जिल्ह्यातील विहिरींचे पुनर्भरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी 62 हजार विहिरींपैकी सुमारे 4 हजार 274 विहिरी पुनर्भरणासाठी पात्र ठरल्या आहेत. पुनर्भरणातून विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने त्या पाण्याचा फायदा पिण्यासाठी तसेच जनावरांसाठी होणार आहे. अवर्षणप्रवण परिस्थितीमध्ये या पाण्याचा योग्य वापर करता येणार आहे. त्यासाठीच जिल्हा प्रशासनाने रोजगार हमी योजनेतून विहिरींचे पुनर्भरण करण्याचे ठरवले आहे. पुनर्भरणासाठी पात्र विहिरींसाठी तालुका कृषी अधिकारी तसेच गटविकास अधिकार्यांकडून सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यांच्या स्तरावरच विहिरींना पात्र ठरविण्यात येत आहे.
एक विहीर पुनर्भरण करण्यासाठी 18 ते 20 हजारांचा खर्च येतो. याची तरतूद रोजगार हमी योजनेच्या निधीतून करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत 1 हजार 484 विहिरींचे प्रस्ताव आले असून, त्यापैकी 1 हजार 266 प्रस्तावांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे. तर 1 हजार 47 प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात 122 विहिरींच्या पुनर्भरणाचे काम सुरू झाले असून, 272 विहिरींच्या पुनर्भरणाचे काम पूर्ण झाले आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत सर्व सव्वाचार हजार विहिरींचे पुनर्भरण करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे.
हेही वाचा