– वनिता कापसे
आपले मूल अतिशय उद्धट झाले आहे, हे लक्षात आल्यानंतर पालक तीव्र प्रतिक्रिया नोंदवतात. मुलांचे कान पकडून त्यांना ओरडतात; पण यावर हा काही योग्य उपाय नाही. मुलांचा उद्धटपणा कमी करण्यासाठी काही तरी करणे आवश्यक असते; पण ते नेमके कोणत्या पद्धतीने करायचे हे अनेकांना ठाऊक नसते.
बर्याचदा मुले स्वतःला वेगळे सिद्ध करण्यासाठी शाळेत किंवा मित्रांमध्ये उद्धट असल्याचे दाखवतात. छोट्या छोट्या कारणांवरून इतर मुलांना धमकवतात. आपले मूल असे करत आहे, हे लक्षात आल्यानंतर पालकांनी लगेच चिडचिड करू नये. सर्वप्रथम मुलांचे नेमके म्हणणे शातंपणे ऐकून घ्यावे. आपल्या वागणुकीबद्दल त्याचे स्पष्टीकरण काय आहे हे शांतपणे ऐकून घ्यावे. नेमके काय घडले आहे हे विचारल्यानंतर आपण त्याला कोणत्याप्रकारे मदत करू शकतो, हाही प्रश्न विचारावा. म्हणजे मुलांना पालकांबद्दल विश्वास वाटू लागेल.
त्यानंतर मनात कुठलाही किंतू न ठेवता शाळेत जाऊन त्याच्या शिक्षकांशी याबाबत संवाद साधावा. मुलांची बाजू शिक्षकांना व्यवस्थितपणे समजावून सांगावे. शिक्षकांकडून मुलांनी सांगितलेल्या गोष्टींतील सत्यता पडताळून पाहावी. याबाबतीत शाळा नक्कीच तुम्हाला मदत करेल. परिणामी, तुम्ही परिस्थिती सहजपणे हाताळू शकता.
मुलांकडे तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता अथवा कौशल्य नसते. प्रौढ व्यक्तींमध्ये ते असते. त्यामुळे आपण जे काही वागतो आहोत ते चुकीचे आहे हे मुलांना समजत नाही. कदाचित आपण असे वागत असल्यामुळे अधिक लोकप्रिय बनू किंवा आपल्याला कोणी चिडवणार नाही, असा त्यांचा समज असू शकतो. म्हणूनच यामध्ये मुलांचा पूर्ण दोष आहे असे न समजता त्यांची विचार करण्याची पद्धत चुकीची आहे हे सर्वप्रथम पालकांनी जाणून घ्यावे आणि सुसंग, योग्य विचार कसा करावा हे कौशल्याने मुलांना समजावून सांगावे.
बर्याचदा आपण कुठेतरी कमी आहोत, हे झाकण्यासाठी मुले अरेरावीपणाचा मार्ग स्वीकारतात. अशा वेळी पालकांनी प्रथम मुलांना स्वतःशी संवाद साधण्यास शिकवावे. यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागेल; पण यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांची आरेरावीची भाषा जाऊन त्यामध्ये आपोआपच विचारपूर्वक सौम्यपणा येईल. मुलांची ही सवय एका रात्रीत बदलेल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्यामुळे या बाबतीत अतिशय ठाम राहाणे गरजेचे असते. आपली चिकाटी सोडता कामा नये. यासंदर्भात आपल्या मुलाशी दिवसांतून काही वेळ अवश्य बोलावे. अरेरावीची भाषा फार काळ उपयोगात येत नाही, हे त्याला समजावून सांगावे आणि ही सवय सोडली तर कशा पद्धतीने शाळेत आणि इतरत्रसुद्धा तुझी चांगली प्रतिमा तयार होऊ शकेल हे समजावून सांगावे.
शक्य असेल तर मुलाच्या अशा उद्धट मित्रांच्या पालकांना भेटावे. त्यांच्याशी याबाबत चर्चा करावी, अर्थात चर्चा करताना थेट त्यांच्या मुलावर आरोप करून उपयोगाचे नाही, तर आपली मुले कशाप्रकारे चांगल्या सवयींचे, चांगल्या बोलण्याचे धनी होऊ शकतात अशा पद्धतीने चर्चा करावी. म्हणजे चर्चा सकारात्मक होईल. यामुळे सगळ्यांच्या विचाराने मुलांच्या या नको असलेल्या सवयीला सामूहिक हद्दपार करता येईल.