महाड, पुढारी वृत्तसेवा: देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणार्या स्वातंत्र्यवीरांमुळे आज आपण स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत. त्यांचे स्मरण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. गेली अनेक वर्षे महाडच्या हुतात्मा दिनाला आपण हजेरी लावत आहोत. मोर्चे, दहीहंडी उत्सवाला मोठ्या संख्येने हजेरी लावली जाते. मात्र, अशा कार्यक्रमाकडे पाठ फिरवली जाते, अशी खंत व्यक्त करत महाडमधील पंचवीरांचे चरित्र पाठ्य पुस्तकात समावेश करण्यासाठी आणि भावी पिढीला त्यांचा इतिहास समजावा, यासाठी शालेय शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिली.
१० सप्टेंबर १९४२ महाडचा हुतात्मा दिन स्वातंत्र्य सैनिक स्मृती समिती, महाड, रायगड जिल्हा परिषद व महाड नगर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी अभिवादन सभेत आमदार गोगावले बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रभाकर भुस्कुटे, माई गांधी, मुख्याधिकारी संतोष माळी, स्वातंत्र्य सैनिक भाऊ लकेश्री, हुतात्मा कमलाकर दांडेकर यांचे वंशज आदी उपस्थित होते.
सुरुवातीस श्रीकृष्ण बाळ यांनी आपल्या प्रास्ताविकात महाडच्या पंचवीरांचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट व्हावा, हुतात्मा बिरवाडकर व क्रांतीसिंह नाना पुरोहीत यांचे स्मारक बिरवाडीमध्ये व्हावे. जाकमाता येथील चौकाला स्वातंत्र्य सैनिक जनुभाऊ पोतदार यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली.
हुतात्मा विठुल बिरवाडकर व क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहीत यांचे स्मारक होण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार गोगावले यांनी दिले.
प्रभाकर भुस्कुटे यांनी महाडच्या पाच वीरांचे दुर्मिळ छायाचित्रे तयार केली आहेत. कमलाकर दांडेकर, विठ्ठल बिरवाडकर व वसंत दाते यांची चरित्र बनवली आहेत. अर्जुन भोई कडू व नथु टेकावला यांची चरित्र बनवण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रभातफेरी काढून महाडमधील चौकाचौकात असलेल्या हुतात्मांच्या फलकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. बाजार पेठेतून हुतात्मा स्मारक येथे फेरीची सांगता करण्यात आली.
हेही वाचा