पुणे : कारवर चिकटवली खंडणीसाठी चिठ्ठी; 10 लाख दे, अन्यथा कुटुंबातील एकेकाला संपवेल

file photo
file photo

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव पार्क येथील हॉटेलमध्ये जेवण करून घरी निघण्यासाठी हॉटेलच्या बाहेर आलेल्या व्यावसायिकाच्या कारवर 10 लाखांच्या खंडणीची चिठ्ठी चिकटविल्याचा प्रकार समोर आला आहे. दहा लाख न दिल्यास कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एका अनोळखी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हडपसर येथील मगरपट्टा परिसरात राहणार्‍या 37 वर्षीय हॉटेल व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मूळचे बारामती येथील आहेत. ते हॉटेल व्यावसायिक असून, त्यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसायही आहे. दि. 31 जुलै रोजी ते रात्री साडेआठ वाजता त्यांचा मित्र पंकज निकुडे यांच्यासोबत कोरेगाव पार्क येथील लेन नंबर 7 येथील डेझर्ट वॉटर हॉटेल येथे जेवण करण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांनी त्याची कार हॉटेलच्या बाहेरील बाजुला पार्क केली होती.

हॉटेलमध्ये जेवण करून रात्री सव्वाबाराला बाहेर पडल्यानंतर गाडीजवळ गेल्यावर त्यांना त्यांच्या कारच्या दरवाजाला एक पांढरे बंद पाकीट चिकटविल्याचे दिसले. त्यांनी ते बंद पाकीट उघडून पाहिले असता, त्यामध्ये त्यांना एक हिंदी मजकुराची चिठ्ठी सापडली. 'मला दहा लाखांची गरज आहे. मला पैसे दिले नाही, पोलिसांना सांगितले, तर तुझ्या कुटुंबातील एकेक व्यक्तीला मारून टाकेन,' अशी धमकी देण्यात आली. 'तुम्हाला जर विश्वास नसेल तर परवापासून आम्ही तुमच्या मृत्यूची वाट पाहू.

पैसे देताना आमचा एकजरी माणूस पकडला गेला तर आमचे पन्नास लोक आहेत, त्यामुळे तुझ्या कुटुंबातील एकही माणूस जिवंत राहणार नाही, तुझ्या एका चुकीची शिक्षा ही मृत्यू आहे. त्यामुळे आम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करा, पैसे दिल्यावर तू तुझ्या वाटेला, आम्ही आमच्या वाटेला', अशी धमकी चिठ्ठीमध्ये दिली होती. परंतु, फिर्यादी यांनी संबंधित नंबरवर दोन ते तीन वेळा फोन केले; परंतु समोरील व्यक्तीने त्यांचे फोन उचलले नाहीत. त्यानंतर ते घरी गेले.

सकाळी दहा वाजता फिर्यादी जेजुरी येथे गेले व मित्र पंकजबरोबर असताना दुपारी अडीच वाजता पंकज यांच्या मोबाईलवर फोन आला. तसेच पैशाची मागणी करण्यात आली. 'तुझा व तुझ्या कुटुंबीयांचा जीव वाचवायचा असेल तर तू कोरेगाव पार्क येथे जेवणाच्या डब्यात दहा लाख रुपये घेऊन ये. ते कोठे आणयचे, कसे आणायचे ते मी सांगतो', अशी धमकी दिली. दरम्यान या प्रकारानंतर तक्रारदारांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दिली. पुढील तपास कोरेगाव पार्क पोलिस करत आहेत.

याप्रकरणात संबंधित फिर्यादी हे कोरेगाव पार्क येथील हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले असताना त्यांच्या कारच्या दरवाजाला पाकीट चिकटविलेले होते. त्या पाकिटामध्ये 10 लाखांची खंडणी मागणारा मजकूर लिहिला होता. सध्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
– नीलिमा पवार,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोरेगाव पार्क पोलिस ठाणे

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news