अभियांत्रिकी-वैद्यकीय तंत्रज्ञान सोबत हवे

Biomedical File photo
Biomedical File photo
Published on
Updated on
  • शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत

  • अतिदुर्गम भागात मिळेल रुग्णसेवेला अधिक बळकटी

पुणे : गणेश खळदकर : "अभियांत्रिकी आणि वैद्यकीय तंत्रज्ञान यांच्या सहकार्यातून भविष्यात रुग्णसेवेत प्रभावी बदल करता येतील, त्यातून रुग्णसेवेला बळकटी येईल," असे मत अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

कोरोनाच्या उद्रेकात देशातील वैद्यकीय तज्ज्ञ आणि कर्मचारी यांनी त्यांच्या जिवाला धोका असतानाही रुग्णसेवेत कुठेही कमतरता येऊ दिली नाही. परंतु, अनेकवेळा ही संपूर्ण सेवा अपुरी पडते की काय, अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. व्हेंटिलेटरची कमतरता, वैद्यकीय ऑक्सिजनची अपुरी निर्मिती, रेमडेसिवीरचा तुटवडा, वैयक्तिक सरंक्षण सामग्रीचे उत्पादन, अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीच्या घटना, दवाखान्यातील ऑक्सिजनची गळती आणि या सर्व घटनांतून गमावलेले निष्पाप जीव, या सगळ्या घटनांनी एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव करून दिली, ती म्हणजे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय यांचे एकत्रीकरण करणे गरजेचे आहे.

अभियांत्रिकी-वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणाने अनेक उणिवा टाळता येऊन रुग्णसेवेला गती देता येईल, तसेच कोरोनामुळे वैद्यकीय क्षेत्रात झालेली जीवितहानी भविष्यात टाळता येऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. रोगनिदान, उपचार आणि रुग्णसेवा, यामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास रुग्णसेवा अद्ययावत करता येऊ शकते. त्यासाठी ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे यंत्रमानवाद्वारे शस्त्रक्रिया करावी तसेच या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून रुग्णसेवा अतिदुर्गम भागात नेता येईल, असेही मत व्यक्त करण्यात आले.

''रोगनिदान, उपचार आणि रुग्णसेवा, यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर अतिशय यशस्वीपणे होत आहे. यंत्रमानवाद्वारे अत्यंत अचूकपणे शस्त्रक्रिया करता येते. तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णसेवा अतिदुर्गम भागात नेता येईल. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय सेवा यांच्या सहकार्यातून भविष्यात रुग्णसेवेत प्रभावी बदल करता येतील.''
                                                                                             – प्रा. डॉ. समीर जोशी, उपअधिष्ठाता, बी. जे. मेडिकल कॉलेज

''त्रिमितीय प्रतिकृतीनिर्मिती, त्रिमितीय दृष्टिपरीक्षण, त्रिमितीय मुद्रण, आभासी तथा वर्धित वास्तव या तंत्रज्ञानाचा उपयोग यशस्वीपणे वैद्यकीय क्षेत्रात होत आहे. हे तंत्रज्ञान वैद्यकीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी एमआयटी विद्यापीठ डॅसॉल्ट सिस्टिम फाउंडेशनच्या सहकार्याने प्रयत्नशील आहे.''
                                                                             – प्रा. डॉ. गणेश काकांडीकर, संकुलप्रमुख, यंत्र अभियांत्रिकी, एमआयटी

''बहुशाखीय तथा आंतरशाखीय संशोधन ही आजच्या परिस्थितीची गरज आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय यांच्या समन्वयित संशोधनासाठी त्रिमिती तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत आहे. डॉक्टरांना अद्ययावत तंत्रज्ञानाने समृद्ध करण्यासाठी डॅसॉल्ट सिस्टिम फाउंडेशन कार्यरत आहे.''
                                                                                     – हेमंत गाडगीळ, कार्यकारी संचालक, डॅसॉल्ट सिस्टीम फाउंडेशन

काय साधता येईल एकत्रीकरणातून?

  • परिपूर्ण रोगनिदानासाठी त्रिमिती तंत्रज्ञानाचा उपयोग (जसे मेंदूतील गाठी)
  • अवयव रोपणासाठी त्रिमिती मुद्रणाचा उपयोग (दंत/गुडघा/कमरेचे हाडरोपण)
  • अचूक आणि दूरस्थ शस्त्रक्रियेसाठी यंत्रमानवाचा उपयोग (ग्रामीण भागात सेवावृद्धी)
  • कमी खर्चात नावीन्यपूर्ण अद्ययावत उपकरणांची निर्मिती (जसे की व्हेंटिलेटर)
  • कृत्रिम अवयवांसाठी नवीन साहित्यावर संशोधन
  • वैद्यकीय सेवेत यंत्रमानवाचा उपयोग करून संसर्गजन्य रोगात रुग्णाचा थेट संबंध टाळणे
  • सूक्ष्म आणि क्लिष्ट शस्त्रक्रियेसाठी आभासी/वर्धित वास्तवाचा वापर (हृद्यशस्त्रक्रिया)
  • वैद्यकीय उपकरणे यांची निगा आणि त्वरित दुरुस्ती
  • वैद्यकीय उपकरणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग
  • अत्यावश्यक परिमाण नोंदणीसाठी भ्रमणध्वनी आधारित सेवांचा वापर
  • वैद्यकीय तज्ज्ञांची कार्यक्षमता वाढविणे
  • अद्ययावत तंत्रज्ञानावर वैद्यकीय तज्ज्ञांना प्रशिक्षण
  • वैद्यकीय अभ्यासक्रमात तंत्रज्ञानाचा समावेश
  • नावीन्यपूर्ण उपचारात प्रथम संगणकीय सदृशीकरणाचा वापर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news