

मुंबई, पुढारी ऑनलाईन : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानसमोर ठेवलेली स्फोटके आणि सचिन वाझेप्रकरणी आगामी काळात धक्कादायक माहिती उघड करू, शिवाय ईडी ( ED, Sachin Waze ) भाजपसाठी कशी काम करत आहे, याचे पुरावेही मांडू, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. परमबीर सिंग आणि वाझे या दोघांनी मिळून हा सगळा बनाव केला होता. एका क्षुल्लक गुंडाचा बनावट पासपोर्ट तयार करून त्याला पाकिस्तानी हेर म्हणून समोर आणणार होते, असा आरोपही मलिक यांनी केला.
मलिक म्हणाले, अँटिलियासमोर स्फोटके ठेवण्याचा प्रयत्न हा राजकीय हेतूने झाला होता. स्फोटके ठेवण्याचे कारस्थान परमबीर सिंह आणि वाझेंनी मिळून केले होते. सरकारला या दोघांनी चुकीची माहिती देत दिशाभूल केली. मनसुख हिरेन याची हत्या केल्यानंतर देखील ते चुकीची माहिती देत होते. परमबीर सिंह यांची होमगार्डला बदली केल्यानंतर त्यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध इमेलवर तक्रार केली होती. त्याची कॉपी मीडियालाही दिली गेली. हा सगळा विषय राजकीय हेतूने प्रेरित होता. चांदीवाल आयोगाचा अहवाल आल्यानंतर सत्य परिस्थिती समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मलिक पुढे म्हणाले, ' सचिन वाझे याच्या घरी एक बनावट पासपोर्ट एनआयएला सापडला होता. हा पासपोर्ट मुबंईतील एका क्षुल्लक गुंडाचा होता. अँटिलिया प्रकरणात हा बनावट पासपोर्ट तयार केला होता. त्यावर पाकिस्तानचा एक्झिट-एंटर दाखवला गेला होता. हा सगळा प्रकार वाझे आणि परमबीर सिंह यांनी केला होता. या प्रकरणातील वाहनमालक असलेला मनसुख हिरेन शरण येण्यास तयार झाला असता, तर त्याचा एन्काउंटर करण्याची तयारी परमबीर सिंग आणि सचिन वाझे याने केला होता. वाझेच्या घरातून एनआयएला तो फेक पासपोर्ट मिळालेला आहे. एनआयएनं ते उघड करावे', असे आवाहनही त्यांनी केले.
'ईडीच्या बाबतीत आमचा शोध सुरू आहे. भविष्यात त्याबाबत मोठा धमाका होणार आहे. केंद्र सरकार म्हणेल तसं हा विभाग चालतोय. राणेंना आलेल्या ईडीच्या नोटिशीचं काय झालं हे कुणाला माहिती नाही. ईडीच्या माध्यमातून गुजरातमधील काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस सोडली. बंगालमध्ये तेच झाले. जे नेते भाजपमध्ये गेले त्यांच्या ईडी चौकशीचे काय झाले,' असे मलिक म्हणाले.
हेही वाचलं का?