अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा संकटात

अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा संकटात
Published on
Updated on

मावळात पावसाची रिपरिप

कार्ला : मावळ तालुक्यात मंगळवारी रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू असून, अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.नियमित मान्सूनचा कालावधी उलटून गेला आणि डिसेंबर महिना सुरू झाला असला तरी वरुणराजा थांबण्याचे नाव घेत नाही. मंगळवारी रात्रीपासून परिसरात पावसाची रिपरिप सुरूच असल्याने अनेकांच्या दैनंदिन कामकाजाचा खोळंबा झाला होता.

त्यातच पावसाने यावर्षी उघडीपच घेतली नसल्याने रब्बी पिकांसाठी आवश्यक असणारे पोषक हवामान लाभले नसल्याने पेरण्याही रखडल्या आहेत. काही शेतकर्‍यांनी पेरणीची कामे उरकून घेतली असली तरी अवकाळी पावसामुळे दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या भागात प्रामुख्याने गहू, ज्वारी, हरभरा, मसूर, कडवे वाल (पावट) तसेच काही प्रमाणात तुरीचे पीक घेतले जाते.

यापैकी काही पिकांना या पावसामुळे नुकसान होणार नसले तरी अन्य पिके मात्र उद्धवस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. मुळात मावळ तालुक्याचे वातावरण पाहता पावसाळ्यात भात तर हिवाळ्यात रब्बी अशी दोन पिके घेतली जातात. त्यातच यावर्षी मुसळधार व अवकाळी पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले असल्याने आधीच मावळातील शेतकरी उद्धवस्त झाला होता.

त्यातच पुन्हा एकदा वरुणराजाची अवकृपा झाल्याने रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे पुन्हा नुकसान झाले तर शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.लोणावळ्यात पावसाची रिपरिप

लोणावळा :

लोणावळा शहरात मागील दोन दिवसांपासून थंडी व गार वारे सुटल्यानंतर बुधवारी पहाटेपासून थंडीचा लाट व सोबत पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई, पुणे व घाटमाथ्यावरील लोणावळा परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. गारवादेखील मोठ्या प्रमाणात असल्याने परिसरात थंडीची लाट पसरली आहे. वातावरणात अचानकपणे बदल घडू लागल्याने त्याचे विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागले असून साथीच्या आजारांना चालना मिळू लागली आहे.

दुसरीकडे अवकाळी पावसामुळे दुबार पिकांची कामे रखडली आहेत. काही ठिकाणी पेरण्यांची कामे झाली असली तरी पावसामुळे मोड खराब होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. विटभट्टी चालकांचेदेखील पावसामुळे नुकसान झाले आहे.
नाणे मावळात पावसाची हजेरी

कामशेत :

गेले दोन दिवस परिसरात ढगाळ वातावरण होते. मंगळवारी रात्रीपासून पावसाने सुरुवात केली. हवेत गारठा असून थंडी जाणवत आहे. अवकाळी पाऊस व बदललेल्या वातावरण शेतीला हानीकारक ठरत आहे. रब्बी पिकांचे नुकसान होत आहे. ऊस, हरभरा, गहू, मसूर, वाल, वाटाणा इत्यादी कडधान्य पिकांना या पावसामुळे नुकसान होणार आहे. काही शेतकर्‍यांनी कडधान्यांची पेरणी केली आहे तर काहींचे पीक उगवण्यास सुरवात झाली आहे. यामुळे येथील शेतकरी चिंतेत आहे. तसेच, शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

हा पाऊस शेतीसाठी नुकसानदायक ठरत असून शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा पाउस दोन-तीन दिवस असाच राहिला तर येणारे कडधान्य पीक शेतकर्‍यांच्या हातून जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
देहूरोडमध्ये पावसामुळे त्रेधातिरपीट

देहूरोड :

परिसरात बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यातच थंडीमुळे हुडहुडी भरली होती. जसजसा दिवस पुढे गेला तसा पावसाचा जोर वाढला. दिवसभर पाऊस सुरू होता.देहूरोडमध्ये पावसामुळे दाणादाण उडाली. सकाळी ऐन कामाला जाण्याच्यावेळी कडाक्याच्या थंडीत पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. भाजीपाल्याचे दर नुकतेच आवाक्यात येत होते. या पावसामुळे पुन्हा एकदा दर वाढण्याची शक्यता आहे.

शितळानगर रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून डबकी झाली होती. भाजी मंडई परिसरात पावसामुळे पथारीवाल्यांचे हाल झाले. पावसामुळे माल खराब झाला. इंद्रायणी दर्शन येथे कृष्ण मंदिराजवळ महामार्गावर पाणी साठले होते. त्यामुळे या परिसरात वाहतूक मंदावली होती. पावसामुळे सिंगल फेजिंग झाले होते.

त्यामुळे नदीवरील पाणी उपसा होऊ शकला नाही. शितळानगर, थॉमस कॉलनी, शितला नगर नंबर-2 येथील पाणीपुरवठा बंद होता. दिवसभर दुरुस्तीचे काम सुरू होते. गुरुवार येणार असल्याने ते पाणी येईल की नाही याची चिंता नागरिकांना सतावत आहे. आज पाणी न आल्यास उद्या पाणी सोडले जाईल, अशी माहिती कर्मचार्‍याने दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news