महाबळेश्वरात मुसळधार पावसामुळे स्ट्रॉबेरी पिकाचे मोठे नुकसान | पुढारी

महाबळेश्वरात मुसळधार पावसामुळे स्ट्रॉबेरी पिकाचे मोठे नुकसान

महाबळेश्वर ; पुढारी वृत्तसेवा; गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वर शहर व परिसरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ऐन हिवाळ्यात महाबळेश्वरकरांसह पर्यटक जून महिन्यासारखा पावसाचा ‘फील’ अनुभवत आहेत. मात्र, दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाचा फटका स्ट्रॉबेरी पिकाला बसला असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

महाबळेश्वरसह परिसरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस काेसळत असून कडाक्याची थंडी, दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या संततधार पावसामुळे महाबळेश्वरवासियांना जून महिन्यात कोसळणाऱ्या पावसाचा फील येत आहेत. तर  पर्यटक बदलेल्या वातावरणाचा आनंद लुटत आहेत.

मुख्य बाजारपेठेसह वेण्णालेक परिसरात पर्यटकांची रेलचेल असून कडाक्याच्या या थंडीत वेण्णालेक व परिसरात हौशी पर्यटक गरमागरम चहा- भजीसह मका, कणीस, फ्रँकी अशा पदार्थांवर ताव मारताना पाहावयास मिळत आहेत.  धुक्यात नौकाविहाराचा आनंद देखील लुटत आहेत. गुलाबी थंडीची अनुभूती पर्यटक घेत आहेत.

स्ट्रॉबेरीचे पीक उद्ध्वस्त होण्याचा धोका

महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. पावसामुळे स्ट्रॉबेरीचे पीक उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला असून, स्ट्रॉबेरीच्या पिकामध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यात पिके कुजून जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

महाबळेश्वरसह लिंगमळा. गुताड. भिलार आदी भागांसह तालुक्यात संपूर्ण दोन हजार हेक्‍टरपेक्षा जास्त स्ट्रॉबेरीची पीक घेतले जाते.
विविध जातीची परदेशी रोपे मागून त्यावर प्रक्रिया करत मदर प्लांटच्या माध्यमातून लाखो रुपयांची निर्मिती केली जाते. यावरच येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांची उपजीविका व उदरनिर्वाह अवलंबून असतो.

उत्पादित झालेले स्ट्रॉबेरी फळ महाराष्ट्राबाहेरही विक्री केली जाते. सध्या स्ट्रॉबेरीचा ३०० ते ३५० रुपयांपर्यंत प्रती किलो दर आहे. मात्र, या अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरीचे फळामध्ये कीड आणि आळी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता पाण्यात साचलेला या स्ट्रॉबेरी पिकाला अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

अवकाळी पावसामुळे लिंगमळा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून शासनाने तातडीने मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
– शरद बावळेकर (स्थानिक शेतकरी)

हेही वाचलंत का? 

Back to top button