पुणे : अप्पर सुपर, इंदरिानगरमध्ये शेवटच्या टप्प्यात बंडखोरी शक्य..!

पुणे : अप्पर सुपर, इंदरिानगरमध्ये शेवटच्या टप्प्यात बंडखोरी शक्य..!
Published on
Updated on

ज्ञानेश्वर बिजले /रघुनाथ कसबे

बिबवेवाडी : प्रभाग क्रमांक 48 (अप्पर सुपर इंदिरानगर) मध्ये आलेल्या भागामध्ये गेल्या निवडणुकीत भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांनी बाजी मारली असली तरी, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसही जोरदार लढतीच्या तयारीत आहे. अनेक इच्छुक तयारीला लागले असल्याने, या प्रभागात शेवटच्या टप्प्यात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बिबवेवाडी भागातील मध्यमवर्गीय व कष्टकरी समाज बहुसंख्येेनेे असलेल्या या प्रभागात जुना प्रभाग 37 मधील (अप्पर सुपर इंदिरानगर) 85 टक्केभाग, तर जुन्या प्रभाग 38 मधील (बालाजीनगर राजीव गांधीनगर) 15 टक्के समाविष्ट झाला आहे. जुन्या 38 प्रभागातील चैत्रबन झोपडपट्टी नवीन प्रभागाला जोडली आहे.

राजकीय समीकरणे जुनीच

जुन्या प्रभाग 37 मधील भाजपचे रूपाली धाडवे, वर्षा भीमराव साठे व शिवसेनेचे प्रमोद उर्फ बाळा ओसवाल हे तिघे जण, तर प्रभाग 38 मधील प्रकाश कदम, मनीषा राजाभाऊ कदम विद्यमान नगरसेवक आहेत. गेल्या निवडणुकीत सर्वत्र चार नगरसेवकांचा एक प्रभाग असला, तरी प्रभाग 37 हा तीनच नगरसेवकांचा होता. यंदा सर्वच प्रभाग तीन नगरसेवकांचे आहेत. त्यामुळे, प्रभाग नवीन झाला असला, तरी राजकीय समीकरणे जुनीच कायम राहणार आहेत. प्रभाग 37 मध्ये गेल्या निवडणुकीत भाजप व शिवसेनेतच मुख्य लढत रंगली होती. त्यात, भाजपचे दोन तर सेनेचा एक उमेदवार निवडून आला. या वेळी महाविकास आघाडी झाल्यास, प्रभागातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नवीन प्रभाग 48 मधील एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव झाली आहे. एक जागा महिलेसाठी आरक्षित राहील. त्यामुळे, उरलेली जागा आघाडीत कोणाच्या वाट्याला येणार, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचेही प्रबळ इच्छुक असून, त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. आरक्षण व उमेदवारी न मिळाल्यास, विद्यमान नगरसेवक दुसरा पर्याय शोधण्याच्या तयारीत आहेत.
नव्या प्रभागामध्ये हातावर पोट भरणार्‍यांची संख्या मोठी आहे. कष्टकरी, कामगार, हमाल, रिक्षाचालक, टेम्पो चालक, घरकाम करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सोसायटीतील मतदारांची संख्या तुलनेेने कमी आहे.

वंचित आणि रिपाइंची ताकत मोठी

या प्रभागात वंचित बहुजन विकास आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या कार्यकर्त्यांची संख्याही मोठी आहे. काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. या प्रभागात भाजपकडून दिनेश उर्फ पिंटू धाडवे, भीमराव साठे, अजय भोकरे, शारदा अजय भोकरे इच्छुक आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गणेश मोहिते, सतीश वाघमारे, शशिकला कुंभार इच्छुक आहेत. काँग्रेसच्या वतीने सतीश कांबळे, इंदिरा अहिरे, जयकुमार ठोंबरे व केतन जाधव, तसेच शिवसेनेकडून प्रमोद उर्फ बाळा ओसवाल, सचिन जोगदंड, महेश कदम, गणेश पाटील हे इच्छुक आहेत. मनसेतर्फे राहुल गवळी, महेश भोईबार इच्छुक आहेत. आरपीआय व भाजप युती झाल्यास बाबुराव घाडगे व लता बाबुराव घाडगे यांनीही तयारी केली आहे. वंचित बहुजन विकास आघाडीतर्फे रवी गायकवाड यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

अशी आहे प्रभाग रचना

विघ्नहर्तानगर, कॅनरा बँक, वैभव सोसायटी, ओमकार नगर, शिवतेजनगर, गणेशनगर, स्वामी समर्थनगर, खडके वस्ती, तुळजाभवानीनगर, साईनगर, सरगमचा अंबिका नगर, अण्णाभाऊ साठे वसाहत, शेळके वस्ती, त्रिमूर्तीनगर, पी एम टी कॉलनी, बिलाल मज्जित, महेश सोसायटी, शांतीनगर सोसायटी, अप्पर सुपर 276 कोटा चैत्रबन वसाहत, चिंतामणीनगर भाग 2 व 3 शिवरायनगर.

  • लोकसंख्या – 56,884
  • अनुसूचित जाती – 14,691

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news