Ratnakar Mahajan Passes Away: काँग्रेसचा अभ्यासू चेहरा हरपला; ज्येष्ठ नेते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन

Congress Former Spokesperson Ratnakar Mahajan Passes Away Pune: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे शनिवारी सकाळी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.
Ratnakar Mahajan Passes Away
Ratnakar Mahajan Passes AwayPudhari
Published on
Updated on

Congress Former Spokesperson Ratnakar Mahajan Passes Away Pune: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे शनिवारी सकाळी पुण्यात निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रत्नाकर महाजन यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी एक वाजता पुण्यातील नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने काँग्रेसने अभ्यासू, संयमी आणि वैचारिक भूमिका ठामपणे मांडणारा ज्येष्ठ नेता गमावला आहे.

डॉक्टरकी सोडून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रवेश

रत्नाकर महाजन यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले होते. मात्र, समाजवादी विचारसरणीचा प्रभाव आणि सामाजिक प्रश्नांबाबतची बांधिलकी यामुळे त्यांनी वैद्यकीय क्षेत्रापेक्षा सामाजिक कार्याची वाट निवडली. जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे आणि ग. प्र. प्रधान यांसारख्या पुरोगामी विचारवंतांच्या विचारांचा त्यांच्या जडणघडणीवर मोठा प्रभाव होता.

समाजवादाबरोबरच आगरकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांनाही त्यांनी आपल्या सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात महत्त्व दिले.

आणीबाणीच्या काळात सक्रिय सहभाग

देशातील राजकीय उलथापालथीच्या काळातही महाजन यांनी आपली वैचारिक भूमिका सोडली नाही. आणीबाणीच्या काळात त्यांनी सक्रियपणे काम केले. या काळात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. संघर्षाचा हा अनुभव त्यांच्या पुढील सार्वजनिक जीवनावरही उमटला.

सामाजिक क्षेत्रात काम करताना त्यांनी विविध संस्थांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. लोकबोधिनी संस्थेचे अध्यक्षपद तसेच राज्य नियोजन महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली.

Ratnakar Mahajan Passes Away
Iran Us War Explainer: अमेरिका- इराण युद्ध चिघळण्याची चिन्हे, ऐन सणासुदीत भारतीयांची चिंता वाढणार

काँग्रेसची बाजू अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडली

पुढे रत्नाकर महाजन काँग्रेसशी जोडले गेले आणि पक्षाचे प्रवक्ते म्हणून त्यांनी ठसा उमटवला. विशेषतः डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात काँग्रेसला राजकीय विरोधाचा सामना करावा लागत असताना त्यांनी पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेसमोर मांडली.

महाजन यांच्या वक्तृत्वाची वेगळी ओळख होती. राजकीय विरोधकांवर वैयक्तिक टीका करण्याऐवजी तथ्य, अभ्यास आणि वैचारिक मुद्द्यांच्या आधारे आपली भूमिका मांडण्यावर त्यांचा भर असे. त्यामुळे काँग्रेसची बाजू मांडताना त्यांचा संयमी आणि तर्कशुद्ध दृष्टिकोन अनेकदा पाहायला मिळाला.

Ratnakar Mahajan Passes Away
Ganeshotsav Mahaprasad FDA Rules: गणेश मंडळांच्या महाप्रसादासाठी आता केटरर्सना एफडीएची प्रक्रिया बंधनकारक

राजकीय संवादाची वेगळी ओळख

राजकारणातील चर्चेचा स्तर दिवसेंदिवस खालावत असताना रत्नाकर महाजन यांची शैली त्याहून वेगळी होती. मतभेद असतानाही अपशब्द किंवा आक्रस्ताळेपणा न करता विरोधकांना आपली भूमिका पटवून देण्याची त्यांची हातोटी होती.

राजकीय विचारांशी निष्ठा, अभ्यासपूर्ण मांडणी आणि सार्वजनिक जीवनातील नैतिकता या गुणांमुळे त्यांनी काँग्रेसमधील एक वैचारिक आणि संयमी चेहरा म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.

रत्नाकर महाजन यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एका अभ्यासू व्यक्तिमत्त्वाची कारकीर्द संपुष्टात आली आहे. त्यांच्या निधनाबद्दल राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news