

कॉंग््रेास, शिवसेना (उद्धव ठाकरे) व मनसे यांचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असतानाही मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तिन्ही पक्षांनी जादा जागांवर उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने आता आघाडीचे गणित जुळवण्यासाठी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी करावी लागणार आहे. यासाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची एक बैठक बुधवारी पार पडली, तर गुरुवारी देखील याबाबतची बैठक होणार आहे. या बैठकीत कोणाला उमेदवारी मागे घेण्यास सांगायचे, यावर चर्चा सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 2 जानेवारी असून, या दिवशी पक्षनेत्यांचे आदेश उमेदवार ऐकणार का? हे पाहावे लागणार आहे.
पालिकेच्या निवडणुकीत कॉंग््रेास, शिवसेना व मनसे एकत्रित लढण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर जागावाटपांचा फॉर्म्युलाही ठरला होता. कॉंग््रेास 90, शिवसेनेला 75 जागा दिल्या आहेत. यातील 25 जागा या मनसेला देण्यात आल्या आहेत. मात्र, ठरलेल्या जागांपेक्षा जास्त अर्ज भरण्यात आले. अनेकांना एबी फॉर्म न मिळाल्याने नाराजी देखील वाढली होती. मंगळवारी कॉंग््रेासच्या 100 उमेदवारांनी, तर शिवसेनेच्या 75 आणि मनसेच्या 43 उमेदवारांनी अर्ज भरले. मनसे आणि शिवसेनेने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामुळे ठरलेल्या जागावाटपापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज भरल्याने याचे गणित कसे बसवायचे, याची चर्चा तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सुरू आहे.
यासंदर्भात बुधवारी तिन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एकत्रित चर्चा झाली. अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात उमेदवार दिल्याने तिन्ही पक्षांची अडचण झाल्याने हा तिढा सोडवण्यासाठी चर्चा झाली. 41 प्रभागांत ठरल्यानुसार उमेदवार यादी अंतिम करण्यावर तिन्ही पक्ष चर्चा करणार असून, उमेदवारी कुणी मागे घ्यावी, याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या बैठकीकडे आता तिन्ही पक्षांच्या उमेदवारांचे लक्ष लागून आहे.
अर्ज मागे घेण्याचा आदेश कोण-कोण पाळणार?
जवळपास साडेतीन वर्षांपासून निवडणुका न झाल्याने अनेकजण निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश आले, तर कोण-कोण उमेदवारी अर्ज मागे घेतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जर पक्षाने एबी फॉर्म दिला असेल आणि अशा काही उमेदवारांना अर्ज मागे घ्यायचा असेल तर ती प्रक्रिया देखील किचकट आहे. 2 जानेवारीला अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. यानंतर 3 तारखेला लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
ठरलेल्या जागावाटपापेक्षा तिन्ही पक्षांचे जास्तीचे एबी फॉर्म दिले आहे. आम्ही 89 जागांवर उमेदवार दिले आहेत. काही प्रभागांत आघाडीचे उमेदवार एकमेकांविरोधात आहेत. हा गोंधळ दूर करण्यासाठी तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्र येऊन गुरुवारी चर्चा करणार आहोत. अंतिम उमेदवारी यादी करण्यात येईल. यानंतर कोणाला उमेदवारी मागे घ्यायची आहे याबाबत निरोप देण्यात येईल.
अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, कॉंग््रेास
उमेदवारीबाबत गोंधळ दूर करण्यासाठी गुरुवारी बैठकीचे आयोजन केले आहे. आम्ही तिन्ही पक्षांचे नेते एकत्र येऊन नावे अंतिम करणार आहोत.
प्रशांत बधे, माजी नगरसेवक, शिवसेना